मंत्री रातोरात सुरतला गेले; गृह खात्याला कळले कसे नाही? : शरद पवारांचा सवाल | पुढारी

मंत्री रातोरात सुरतला गेले; गृह खात्याला कळले कसे नाही? : शरद पवारांचा सवाल

मुंबई पुढारी वृत्तसेवा : विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर राज्याचे मंत्री आणि आमदार रातोरात मुंबईतून सुरतला गेले. गृह खात्याला याची माहिती कशी नाही, त्यांना हे कळायलाच हवे होते, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी बैठकीत संताप व्यक्‍त केला.

शिवसेनेतील राजकीय भूकंपाच्या पार्श्‍वभूमीवर शरद पवार यांनी पक्षातील प्रमुख नेत्यांची बैठक घेतली. एकनाथ शिंदे हे राज्याचे ज्येष्ठ मंत्री आहेत. त्यांच्यासोबत आणखी एक-दोन मंत्री होते. मंत्र्यांना पोलिसांची सुरक्षा असते. याचा अर्थ सीमेपर्यंत त्यांच्यासोबत पोलिस होते. तरीही गृह खात्याला ही माहिती कशी कळाली नाही, असा सवाल पवार यांनी केला.

बैठकीला स्वतः गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, जलसंपदामंत्री जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होते. शिवसेनेत निर्माण झालेली अंतर्गत बंडाळी हा त्या पक्षाचा वैयक्‍तिक प्रश्‍न आहे. या पेचप्रसंगातून बाहेर पडण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सक्षम आहेत. राष्ट्रवादीचा त्यांना पूर्णपणे पाठिंबा राहील, अशी ग्वाही पवार यांनी बैठकीत दिली. बैठकीबाबतची माहिती पक्षाचे नेते अमोल मिटकरी यांनी पत्रकारांना दिली. एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे भाजपच आहे. महाविकास आघाडीच्या सत्तेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न त्यांनी यापूर्वीही केला होता, तो यशस्वी झाला नाही; आताही होणार नाही, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा

Back to top button