मेट्रोतून 10 लाख नागरिकांचा प्रवास | पुढारी

मेट्रोतून 10 लाख नागरिकांचा प्रवास

पुणे, पुढारी वृत्तसेवा: महामेट्रोच्या पुणे मेट्रो प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर असून, पुणे मेट्रोने शनिवारी 10 लाख प्रवासी संख्येचा टप्पा पार केला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रो प्रकल्पातील गरवारे कॉलेज ते वनाज या पहिल्या टप्प्यातील मार्गिकेचे उद्घाटन झाल्यापासून आतापर्यंत 10 लाख प्रवाशांनी प्रवास केला.

गरवारे कॉलेज ते वनाज आणि पिंपरी ते फुगेवाडी या दोन्ही मार्गांवर आतापर्यंत एकूण 5 हजार 581 फेर्‍या झाल्या आहेत. यात पिंपरी-चिंचवड महानगरपालिका स्थानक ते फुगेवाडी स्थानकांदरम्यान 2 हजार 483 फेर्‍या व वनाज स्थानक ते गरवारे कॉलेज स्थानक या मार्गावर 3 हजार 098 फेर्‍या झाल्या.

साडेतीन महिन्यांत दीड कोटी उत्पन्न

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका स्थानक ते फुगेवाडी स्थानक या फेर्‍यांचे एकूण अंतर 35059.96 किमी, तर वनाज स्थानक ते गरवारे कॉलेज स्थानक या फेर्‍यांचे एकूण अंतर 30732.16 किमी आहे. पुणे मेट्रो ही विजेच्या साहाय्याने धावत असून, मेट्रोला 1 किमी अंतर पार करण्यासाठी साधारणतः 5 युनिट वीज लागते, याचा साधारणतः खर्च 40 रुपये येतो. पुणे मेट्रोने या साडेतीन महिन्यांत 1 कोटी 47 लाख 80 हजार 882 रुपये उत्पन्न मिळविले आहे.

पुणे मेट्रोचे काम वेगाने सुरू आहे. उर्वरित उन्नत मार्गांची कामे डिसेंबर 2022 पर्यंत करण्याचे नियोजन केले आहे. याव्यतिरिक्त सर्व भुयारी मार्गांसह संपूर्ण मेट्रोची कामे एप्रिल 2023 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

                          – डॉ. ब्रिजेश दीक्षित, संचालक, महामेट्रो

हेही वाचा

कोल्हापूर : सीपीआरमध्ये अत्याधुनिक डिजिटल रेडिओग्राफी एक्स-रे यंत्र रुग्णसेवेत!

बालभारती ते पौड मार्गाचे लवकरच सर्वेक्षण

आयुक्तांच्या बनावट स्वाक्षरीने नियुक्ती पत्र; गुन्हा दाखल करण्याचा आदेश

 

Back to top button