पिंपरी प्रभागरचनेबाबत आज उच्च न्यायालयात सुनावणी | पुढारी

पिंपरी प्रभागरचनेबाबत आज उच्च न्यायालयात सुनावणी

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभागरचनेबाबत राज्य निवडणूक आयोग व पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून चुकीच्या पध्दतीने कार्यवाही करण्यात आली. या प्रक्रियेला भाजपचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडिगेरी यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यावर शुक्रवारी (दि. 17) अंतिम सुनावणी होणार आहे.

प्रभागरचनेसंदर्भात लेखी तक्रारी व हरकती घेऊन देखील पालिका व आयोगाकडून न्याय मिळाला नाही. त्यामुळे विलास मडिगेरी यांनी न्यायालयात आव्हान दिले. प्रारुप प्रभागरचनेवरील सुनावणी अहवाल उपलब्ध न करून दिल्याबाबत त्यांनी आक्षेप घेतला होता. न्यायालयाच्या आदेशानंतर तो अहवाल याचिकाकर्त्यास उपलब्ध करून देण्यात आला.

या याचिकेवर झालेल्या सुनावणीमध्ये प्रभागरचनेतील त्रुटी व राज्य निवडणूक आयोगाच्या चुकांसंदर्भात सविस्तर म्हणणे उच्च न्यायालयाने ऐकून घेतले आहे. सुनावणीदरम्यान विविध बाबतीत राज्य निवडणूक आयोग, शासन आणि पालिका निवडणूक यंत्रणा यांच्या चुका उघड झालेल्या आहेत. यामध्ये ओबीसी आरक्षणासारख्या मुद्यावर राज्य शासनाची दुटप्पी भूमिका देखील समोर आलेली आहे. 17 जून रोजी होणार्‍या सुनावणीत प्रभागरचनेसंदर्भात अंतिम फैसला होण्याची शक्यता आहे.

महापालिकेच्या आणि निवडणूक आयोगाच्या माध्यमातून झालेल्या चुकांबाबत उच्च न्यायालयाकडून याचिकाकर्ता म्हणून नोंदवलेल्या योग्य आक्षेबाबत न्याय मिळेल, अशी अपेक्षा विलास मडिगेरी यांनी व्यक्त केली आहे. प्राधिकृत अधिकारी व आयोगाचे आयुक्त यांच्या अहवालातील चुका न्यायालयात निदर्शनास आणू देण्यात आल्या आहेत.

महापालिका व आयोगाकडून झालेल्या चुकांवर नोंदविलेलया आक्षेपांबाबत न्याय मिळेल, अशी अपेक्षा विलास मडिगेरी यांनी व्यक्त केली आहे.

Back to top button