कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय; दोन दिवसांत जिल्ह्यात 225 पेक्षा अधिक रुग्ण | पुढारी

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय; दोन दिवसांत जिल्ह्यात 225 पेक्षा अधिक रुग्ण

पुणे, पुढारी वृत्तसेवा: कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने नागरिक बिनधास्त वावरत होते. परंतु, जूनच्या पहिल्या आठवड्यापासूनच कोरोनाबाधितांच्या संख्येत दोन टक्क्यांनी वाढ झाली असून, आता बाधित दर 4.6 टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यात 225 पेक्षा अधिक रुग्णांची नोंद झाली.

कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत असून, संभाव्य चौथ्या लाटेची चर्चा सुरू झाली आहे. गेल्या पंधरा दिवसांत कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या दररोज वाढत असून, त्याच तुलनेत बाधित दरातही वाढ होत आहे. तिसर्‍या लाटेत त्याच समस्या संभाव्य चौथ्या लाटेत उद्भवू नयेत, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत.

Ratnagiri : चक्क पर्यटकांनीच लुटले रिक्षाचालकाला; एक लाखांचा ऐवज केला लंपास

रिकामे ऑक्सिजन सिलिंडर भरून घ्या, ऑक्सिजन प्रकल्प कार्यान्वित करा, अशा सूचना दिल्या आहेत. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागात 24 ते 30 मेदरम्यान 15 हजार 318 चाचण्या करण्यात आल्या. त्यातील 363 जण कोरोनाबाधित आढळले.

त्यांचा बाधित दर 2.3 टक्के असून, 31 मे ते 6 जून यादरम्यान तुलनेत 2 हजार 885 चाचण्या कमी झाल्या आहेत. असे असताना बाधितांची संख्या मात्र वाढली आहे. गेल्या आठवड्यात 557 जण बाधित आढळले असून, त्यांचा बाधित दर 4.4 टक्के आहे, तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

रुग्णालयात दाखल होणार्‍यांची संख्या अल्प

काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली, तरीही रुग्णालयात दाखल होणार्‍यांची संख्या अल्प आहे. पुणे जिल्ह्यात 1022 सक्रिय रुग्णांची संख्या असून, त्यातील पंचवीस रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. उर्वरित 993 रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. पुणे जिल्ह्यात सलग दुसर्‍या दिवशी 222 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यात पुणे ग्रामीण भागातील 31, पुणे महापालिका क्षेत्रातील 140 आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात 51 रुग्ण आहेत.

बहार विशेष : पर्यायी ऊर्जेचे वास्तव

अशी वाढली रुग्णसंख्या
27 मे 52
28 मे 50
29 मे 64
30 मे 38
31 मे 42
1 जून 82
2 जून 83
3 जून 88
4 जून 104
5 जून 92
6 जून 66
7 जून 130
8 जून 187
9 जून 217
10 जून 222

असा वाढला बाधित दर
28 मे – 2.2%
29 मे – 2.8%
30 मे – 2.3%
31 मे – 2.7%
1 जून – 3.5%
2 जून – 4.8%
3 जून – 4.9%
4 जून – 5.9%
5 जून – 4.6%
6 जून – 4.6%

शहरासह जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी केली जात आहे. चाचण्या वाढविण्यावर भर दिला जात आहे. कोरोनाचा लसीचा पहिला, दुसरा आणि दक्षता (प्रीकॉशन) डोस ज्यांचा शिल्लक आहे, त्यांचा शोध घेऊन त्यांचे लसीकरण केले जात आहे. पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यास रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्या चाचण्या करा, तसेच प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

                                                – डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी, पुणे

Back to top button