पुणे : नागपूरच्या सेवानिवृत्त शास्त्रज्ञाला १ कोटी १६ लाखाचा गंडा | पुढारी

पुणे : नागपूरच्या सेवानिवृत्त शास्त्रज्ञाला १ कोटी १६ लाखाचा गंडा

पुणे; पुढारी वृत्तसेवा : नागपूर येथील एका सेवानिवृत्त शास्त्रज्ञाला तब्बल 1 कोटी 16 लाख 52 हजार रुपयांचा आर्थिक गंडा घातला. पुण्यातील उच्चशिक्षित दाम्पत्याने गुंतवणुकीवर जादा परतावा देण्याच्या बहाण्याने ही फसवणूक केली. ही घटना 2 एप्रिल 2021 ते गुन्हा दाखल होईपर्यंतच्या कालावधीत घडली आहे.

याप्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी जितेंद्र शेडगे व प्रिती शेडगे या दाम्पत्यांच्या विरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत बकुळ अपार्टमेंट नागपूर येथील 62 वर्षीय शास्त्रज्ञाने फिर्याद दिली आहे. जितेंद्र शेडगे याला अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे सेवानिवृत्त शास्त्रज्ञ आहेत. तर आरोपी शेडगे याचे संगणकीय शिक्षण झाले आहे. त्याने पत्नीच्या नावावर डोमेन खरेदी केले. त्यानंतर 2015 मध्ये आरोपीने पुणे सीटी डिल्स डॉट कॉम नावाची वेबसाईट सुरू केली. सुरुवातीला तो लाईटबील, मोबाईल रिचार्ज या कॅश बॅक सुविधेच्या नावाखाली नागरिकांना सेवा देऊ लागला. एखाद्या व्यक्तीने त्यांच्यामार्फत एक हजार रुपयाचे मोबाईल रिचार्ज केले तर त्यांना ठरावीक रोख रक्कम आरोपी परत देत होते. त्यामुळे परतावा मिळत असल्यामुळे अनेक नागरिक त्यांच्याकडे जोडले जावू लागले. मात्र ही परताव्याची योजना नसून फसवणूकीचा ट्रॅप आहे हे अनेकांना माहिती नव्हते.

गुंतवणुकीच्या ऑनलाईन योजनांमधून फसवणुकीस सुरूवात

प्राथमिक टप्प्यात त्यांचा हा प्लॅन यशस्वी झाल्यानंतर आरोपींनी 2019 मध्ये विविध नावाने गुंतवणुकीच्या योजना ऑनलाईन टाकण्यास सुरूवात केली. नागरिकांनी त्यांच्याकडे गुंतवणूक केल्यानंतर पहिली काही वर्ष त्याने पैसे परत देखील दिले. त्यामुळे नागरिकांचा त्यांच्यावरील विश्वास वाढत गेला. वेबसाईटच्या माध्यमातून फिर्यादी शास्त्रज्ञाला शेडगे दाम्पत्याच्या गुंतवणूक योजनेची माहिती मिळाली. त्यांनी आरोपींशी संपर्क साधला असता, जादा परताव्याच्या आमिषाने आरोपींनी त्यांना आपल्या जाळ्यात खेचले. फिर्यादींनी आरोपींवर विश्वास ठेवत दोन वर्षात त्यांच्या व नातेवाईकांच्या बँक खात्यातून व क्रेडीट कार्डवरून लाखोंचा गंडा घातला. ही लूट एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 1 कोटी 16 लाख रुपये आरोपींच्या हवाली केले. मात्र गुंतवणूक केल्यानंतर देखील अपेक्षीत पैसे परत मिळत नाही हे लक्षात आल्यानंतर फिर्यादींनी आरोपींशी संपर्क साधला. त्यावेळी त्याना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. फिर्यादींनी सायबर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार अर्ज दिला. दाखल केलेल्या तक्रार अर्जाची चौकशी करून सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. आरोपीनी गुंतवणुकीच्या बहाण्याने अनेकांना आर्थिक गंडा घातल्याचा पोलिसांकडून अंदाज व्यक्त केला जातो आहे.

शेडगे एक महिन्यापासून राहत होता घर बदलून

अनेकांची आर्थिक फसवणूक केल्यानंतर शेडगे हा घर बदलून दुसऱ्या परिसरात वास्तव्य करत होता. दरम्यान सहा पोलीस निरीक्षक बलभीम ननवरे, पोलिस कर्मचारी शिरीष गावडे, प्रसाद पोतदार, पुंडलिक आणि पूजा मांदळे यांच्या पथकाने त्याला धायरी परिसरातून अटक केली.

गुंतवणूकीवर जादा परतावा देण्याच्या बहाण्याने आरोपींनी ही फसवणूक केली आहे. गुन्हा दाखल करून जितेंद्र शेडगे याला अटक करण्यात आली आहे. जर अशाप्रकारे कोणीची आरोपींकडून फसवणूक झाली असेल तर त्यांनी सायबर पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा.

-कुमार घाडगे, पोलिस निरीक्षक सायबर

हेही वाचा

Back to top button