पुण्यात ‘आप’च्या झाडूने होणार साफसफाई | पुढारी

पुण्यात ‘आप’च्या झाडूने होणार साफसफाई

ज्ञानेश्वर बिजले

पुणे : पुण्यातील सर्व जागांवर तरुण, उच्चशिक्षित उमेदवार. नवे फ्रेश चेहरे. सर्वसामान्यांसाठी काम करणारा पक्ष म्हणून मिळविलेली लोकप्रियता. देशाच्या राजधानीत दिल्लीत सत्तेवर मांड ठोकलेला आम आदमी पक्ष (आप) आता प्रथमच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीत निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे.

‘आप’चा झाडू पुण्यात कोणत्या पक्षाला साफ करणार, याचीच उत्सुकता दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. आपच्या उमेदवाराच्या पाठीशी मध्यमवर्गीय उभे राहिल्यास भाजपला अनेक प्रभागात फटका बसण्याची शक्यता आपच्या स्थानिक नेत्यांनी व्यक्त केली. पुण्यातील निवडणूक मुख्यत्वे भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यात होणार असली, तरी आप, वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांचे उमेदवार अनेकांची गणिते बिघडविणार आहेत.

या पक्षांचे काही उमेदवारही महापालिकेच्या सभागृहात पोहोचण्याची शक्यता आहे. मुख्य पक्षांचे काही इच्छुक या तिन्ही पक्षांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे अर्ज भरण्याच्या शेवटच्या टप्प्यात काही प्रभागात बंडखोरी होण्याची शक्यता आहे. ‘आप’ त्यांचा दहावा वर्धापनदिन येत्या नोव्हेंबरमध्ये साजरा करीत आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी 2011 मध्ये दिल्लीत भ्रष्टाचारविरोधी आंदोलन केल्यानंतर दिल्लीचे विद्यमान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी 2012 मध्ये आम आदमी पक्षाची स्थापना केली.

ते दिल्लीत सत्तेवर आले. दिल्लीत लोकसभेच्या सर्व जागा जिंकणार्‍या भाजपला विधानसभेच्या निवडणुकीत दोन्ही वेळा दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. पंजाबमध्ये नुकतीच आपची सत्ता आली. लोकसभेत ‘आप’चा सदस्य नसला तरी राज्यसभेत त्यांचे आठ खासदार आहेत. दिल्लीतील तिन्ही महापालिका, चंदीगड, सुरत महापालिकेत आपचे ठळक अस्तित्व आहे. अनेक राज्यात त्यांनी निवडणुका लढविल्या. पुण्यातही विधानसभा निवडणुकीत त्यांचे उमेदवार होते.

आपने गेले सहा-आठ महिने पुण्यातून महापालिका निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली. फेब्रुवारीत पहिला मेळावा घेतल्यानंतर दोन जून रोजी झालेल्या मेळाव्याला दिल्लीतून पक्षाचे नेते आले होते. केजरीवाल, मनीष सिसोदिया, संजयसिंह, राघव चढ्ढा यापैकी काही नेते निवडणुकीपूर्वी पुण्यात प्रचाराला येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून दिल्लीतील नेते दीपक सिंघला यांची, तसेच राज्य संघटक व पुण्याच्या कार्याध्यक्षपदी विजय कुंभार यांची नियुक्ती केली आहे.

कुंभार म्हणाले, ‘पुणे व पिंपरी-चिंचवडमधील सर्व जागा लढविणार आहोत. पुण्यात 50 टक्के उमेदवारी तरुणांना म्हणजे 40 वर्षे वयोगटापर्यंतच्या कार्यकर्त्यांना दिली जाईल. न्यायाधीश, डॉक्टर, वकील, प्राध्यापक यांच्यासारख्या उच्चशिक्षितांसह रिक्षाचालक व वस्तीपातळीवर काम करणारे कार्यकर्ते ‘आप’कडून लढण्यास इच्छुक आहे. विविध संघटनाही आपसोबत आहेत. सर्वसामान्यांना भेडसावणार्‍या मूलभूत मुद्द्यांवर आम्ही पुण्यात व राज्यात प्रचार करताना भर देणार आहोत. या समस्यांसाठी पुण्यात आम्ही लवकरच आंदोलन करणार आहोत.’

पुण्यात आपची दहा ठिकाणी कार्यालये सुरू झाली आहेत. सर्व प्रभागातील संभाव्य उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. त्यांची दिवसाआड झूम बैठक घेत प्रचाराबाबत सूचना दिल्या जात आहेत. घरोघरी भेटी देण्यास,
तसेच कोपरा सभा घेत प्रचाराला प्रारंभ झाला आहे. काही जागा ठरवून तेथे अधिक जोर देण्याचे आपच्या नेत्यांनी ठरविले आहे. पुण्यात किमान 20 ते 25 जागा जिंकण्याचे आम आदमी पक्षाचे उद्दिष्ट आहे.

हेही वाचा 

पुढारी एज्युदिशा प्रदर्शनाचे शानदार उद्घाटन

नाशिकच्या अधरवड येथे जमावाकडून २० वर्षीय युवतीची हत्या ; 3 घरे जाळली, तालुका हादरला

आचार्‍यांना अच्छे दिन ! कोरोना काळानंतर मागणी वाढली तर हॉटेल व्यवसाय अडचणीत

Back to top button