पुढारी एज्युदिशा प्रदर्शनाचे शानदार उद्घाटन | पुढारी

पुढारी एज्युदिशा प्रदर्शनाचे शानदार उद्घाटन

सांगली : पुढारी वृत्तसेवा
दैनिक पुढारीच्या ‘एज्युदिशा 2022’ या शैक्षणिक प्रदर्शन व मार्गदर्शन व्याख्यानमालेचे शुक्रवारी सांगलीत राममंदिरजवळील कच्छी भवन येथे शानदार उद्घाटन झाले. दरम्यान, सर्वच क्षेत्रात करिअरची संधी आहे, पण विद्यार्थ्यांनी करिअरसाठी आवडीचे क्षेत्र निवडावे. त्यासाठी दैनिक ‘पुढारी’चे हे प्रदर्शन निश्‍चितपणे योग्य दिशा दाखवणारे आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी केले.

‘पुढारी एज्युदिशा-2022’चे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्याहस्ते झाले. दैनिक ‘पुढारी’चे समूह सरव्यवस्थापक अनिल पाटील, महानगरपालिकेचे उपायुक्‍त राहुल रोकडे, संजय घोडावत युनिव्हर्सिटी कोल्हापूरचे विश्‍वस्त विनायक भोसले, संजय घोडावत युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. अरूण पाटील प्रमुख उपस्थित होते. हे प्रदर्शन तीन दिवस असणार आहे.

डॉ. चौधरी म्हणाले, दैनिक ‘पुढारी’ नेहमीच वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवित असते. दैनिक पुढारीचा एज्युदिशा हा उपक्रमही महत्वाचा आहे. शिक्षण हे महत्वाचे आहे. विद्यार्थी, पालक सर्वच जण शिक्षणाबाबत सजग असतात. परंतु योग्य माहिती न मिळाल्याने क्षमता व इच्छा असूनही आवडीच्या क्षेत्रात करिअर करायची संधी हुकते. त्यामुळे एज्युदिशा हे शैक्षणिक प्रदर्शन व मार्गदर्शन अतिशय महत्त्वाचे आहे.

विद्यार्थ्यांनी लाभ घ्या : डॉ. चौधरी

चुकीच्या शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेतला तरा वेळ, पैसा आणि कालावधी वाया जाण्याची भीती असते. मात्र ही अडचण दैनिक ‘पुढारी’च्या या प्रदर्शनामुळे दूर झाली आहे. या प्रदर्शनात नामांकित शिक्षण संस्थांचे स्टॉल्स, विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात करिअरसंदर्भातील मार्गदर्शनाचा खजाना उपलब्ध आहे. विद्यार्थी, पालकांनी याचा लाभ घ्यावा.

एज्युदिशा योग्य दिशा दाखवणारे डॉ. चौधरी म्हणाले, मेडिकल, इंजिनिअरिंग व स्पर्धा परीक्षा म्हणजेच करिअर असे ठराविक झापड लावून घेऊ नये. करिअर करण्यासाठी प्रत्येक क्षेत्रात चांगल्या संधी आहेत. त्याची माहिती या प्रदर्शनात मिळणार आहे. तीन दिवसाच्या कालावधीत विद्यार्थी, पालकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा. चुकीच्या संस्थेत प्रवेश घेतला व चुकीचे क्षेत्र निवडले तर नुकसान होते. ते टाळण्यासाठी हे प्रदर्शन योग्य दिशा दाखवेल.

उपायुक्त रोकडे म्हणाले, विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन व करिअर ओरिएंटेड शिक्षण यासाठी हे प्रदर्शन अतिशय महत्वाचे आहे. अनिल पाटील यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, दैनिक ‘पुढारी’ हे निर्भीड, नि:स्पृहतेबरोबरच सामाजिक प्रश्‍नांची जाण असलेले सर्वमान्य दैनिक आहे. एज्युदिशा हा उपक्रम कोल्हापूरमध्ये 13 वर्षे राबविला जात आहे. करिअरच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शनासाठी हे प्रदर्शन अत्यंत उपयुक्त आहे.

आयआयबी-पीसीबीचे अ‍ॅडमिनिस्ट्रेटर सखाराम अंकुशे, एमआयटी पुणेचे प्रा. नागेश जाधव, प्रा. मोटेगावकर सरांचे आरसीसी प्रा. प्रमोद घुगे, अजिंक्य डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी पुणेचे प्रा. आनंद गंटेलू यांचे स्वागत दैनिक पुढारीचे विभागीय जाहिरात व्यवस्थापक शशिकांत पोवार यांनी केले. प्रदर्शनाला पहिल्या दिवशी विद्यार्थी, पालकांचा मोठा प्रतिसाद लाभला. विद्यार्थी पालकांनी स्टॉल्सना भेट देऊन माहिती
घेतली.

दोन वर्षांमध्ये ‘कोरोना’ने शैक्षणिक क्षेत्रात खूप मोठा प्रभाव पाडला आहे. ‘कोरोना’नंतर सांगलीत प्रथमच ‘पुढारी’ने शैक्षणिक प्रदर्शन भरवून चांगला उपक्रम केला आहे. प्रदर्शनात महाराष्ट्रातील चांगल्या शैक्षणिक संस्थांचे स्टॉल्स आहेत. पारंपरिक शिक्षणापेक्षा उपयोेेेजित शिक्षणाची गरज ओळखून ‘पुढारी’ने विद्यार्थी व पालकांना प्रत्यक्ष संस्थेशी भेटण्याची, चर्चा करण्याची, शंका निरसन करून करिअर निवडण्यासाठी चांगली संधी उपलब्ध करून दिली आहे.– शहाजी शिंदे अध्यक्ष, एकलव्य शिक्षण समूह, सांगली.

पुढारी एज्युदिशा : आजचे कार्यक्रम

सकाळी 11 ते 12 : कौशल्यावर आधारित 21 व्या शतकातील रोजगाराभिमुख संधी. व्याख्याते- प्रा. अमिर शिकलगार (सिंबायोसिस स्किल्स अ‍ॅण्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, पुणे)
दुपारी 12 ते 1 : युपीएससी आणि एमपीएससीमधील करिअरच्या संधी. व्याख्याते- प्रा. पी. डी. चव्हाण (युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे)
दुपारी 4 ते 5 : व्यवस्थापन शिक्षण आणि करिअरच्या संधी. व्याख्याते – प्रा. रणधीरसिंह मोहिते (वरिष्ठ प्राध्यापक, यशोधा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, सातारा).
सायंकाळी 5 ते 6 : अ‍ॅनिमेशन क्षेत्रातील करिअरच्या संधी. व्याख्याते – फ्रेम बॉक्स, पुणे.

Back to top button