Pudhari News Exit Poll : ‘एक्झिट पोल’मध्ये मोदी सरकारची ‘हॅटट्रिक’! NDA ला ३५० तर इंडियाला १५० जागा

Pudhari News Exit Poll : ‘एक्झिट पोल’मध्ये मोदी सरकारची ‘हॅटट्रिक’! NDA ला ३५० तर इंडियाला १५० जागा

नवी दिल्लीपुढारी वृत्तसेवा- लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्याचे मतदान पार पडताच वृत्तवाहिन्यांवरील "एक्झिट पोल"चे अंदाज प्रसारित होऊ लागले आहेत. या सर्व एक्झिट पोलमध्ये देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा भाजप व एनडीए आघाडीचे सरकार सत्तेवर येणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. एनडीए आघाडीला तब्बल ३५० तर इंडिया आघाडीला १५० पेक्षा जास्त जागा मिळतील, असा दावा करण्यात आला आहे.

यंदाच्या निवडणुकीत भाजपने दक्षिण भारतात पहिल्यांदाच जोरदार कामगिरी केली असल्याचे एक्झिट पोलमध्ये म्हटले आहे. तामिळनाडू आणि केरळमध्ये भाजपने गेल्या निवडणुकीच्या तुलनेत चांगली कामगिरी बजावली आहे. कर्नाटकात काँग्रेसचे सरकार असतानाही भाजपला फारसे नुकसान झाले नाही. तेलंगणा, आंध्रप्रदेशातही एनडीएला अपेक्षित लक्ष्य साधण्यात यश आले आहे.

महाराष्ट्रात मात्र, एनडीए आघाडीला जोरदार फटका बसणार असल्याचे या एक्झिट पोलमध्ये म्हटले आहे. भाजपसोबत असलेल्या शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाच्या महायुतीला काँग्रेससोबतच्या शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार) गटाच्या महाविकास आघाडीने या निवडणुकीत जोरदार टक्कर दिली आहे. त्यामुळे एकूण ४८ जागांपैकी महाविकास आघाडीला महायुतीच्या बरोबरीने अथवा त्यांच्यापेक्षा जास्त जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

मध्यप्रदेश, गुजरात, छत्तीसगड, झारखंडमध्ये भाजप आणि मित्र पक्षांची एनडीए आघाडी गेल्या निवडणुकीप्रमाणे यंदाही सर्वच्या सर्व जागा जिंकण्याची कामगिरी बजावणार असल्याचे या अंदाजात म्हटले आहे. बिहार आणि राजस्थानात एनडीएला थोडे नुकसान होणार आहे. इंडिया आघाडीला या दोन्ही राज्यांत गेल्या निवडणुकीपेक्षा जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे.

एक्झिट पोलचे असे आहेत अंदाज

रिपब्लिक भारत : पी मार्क – एनडीए ३५९, इंडिया आघाडी १५४, इतर ३०
इंडिया न्यूज : डी डायनॅमिक्स – एनडीए ३७१, इंडिया १२५, इतर ४७
रिपब्लिक भारत : मॅट्रिझ एनडीए ३५३-३६८ इंडिया – ११८-१३३, इतर – ४३-४८
टीव्ही ५ तेलुगू : एनडीए ३५९, इंडिया – १५४, इतर – ३०
जन की बात : एनडीए ३६२-३९२, इंडिया १४१-१६१, इतर १०-२०
न्यूज नेशन : एनडीए ३४२-३७८, इंडिया १५३-१६९, इतर २१-२३
एबीपी-सी वोटर्स एनडीए – ३५३-३८० इंडिया – १६२-१८२, इतर ०४-१२
दैनिक भास्कर एनडीए- २८१-३५०, इंडिया – १४५-२०१, इतर – ३३-४९

"एक्झिट पोल" नेमके काय?

निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर सर्वेक्षणाच्या आधारावर निवडणूक निकालाचा अंदाज वर्तविण्याला "एक्झिट पोल" म्हटले जाते. मतदान करून आलेल्या मतदारांशी बातचीत करून त्यांना विचारलेल्या काही प्रश्नांच्या आधारावर निवडणूक सर्वेक्षणाचा अहवाल तयार केला जातो. या अहवालाचे विश्लेषण करून निवडणूक निकालाचा अचूक अंदाज वर्तविला जातो. वेगवेगळ्या संस्था आणि वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून हे सर्वेक्षण केले जाते. मतदान पार पडताच सर्व वृत्तवाहिन्यांवर "एक्झिट पोल" चे अंदाज प्रसिद्ध केले जातात.

२०१९ मध्ये भाजप, एनडीएला अंदाजापेक्षाही जास्त यश

२०१९ लोकसभा निवडणुकीत १३ संस्थांनी "एक्झिट पोल" सर्वेक्षण केले होते. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएला बहुमत मिळेल, असा दावा करण्यात आला होता. त्यानुसार एनडीएला ३०६ जागा आणि यूपीएला १२० जागा मिळतील, असा अंदाज बांधण्यात आला होता. मात्र, एनडीएला ३५३ जागा मिळाल्या होत्या. भाजपने ३०३ जागा जिंकल्या होत्या. यूपीएला केवळ ९३ जागांवर समाधान मानावे लागले होते. कांग्रेसला फक्त ५२ जागा मिळाल्या होत्या.

२०१४ लोकसभा निवडणुकीतही आठही एक्झिट पोलमध्ये देशात मोदी लहर असून भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला २८३ जागा मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. कांग्रेसच्या नेतृत्वाखालील युपीएला १०५ जागा मिळणार असल्याचे म्हटले होते. मात्र, त्यावेळी एनडीएने ३३६ तर भाजपने २८२ जागा जिंकल्या होत्या. व युपीएला फक्त 60 जागा मिळाल्या होत्या. त्यामध्ये काँग्रेसच्या ४४ जागांचा समावेश होता.

नेत्यांच्या अशा आहेत प्रतिक्रिया

दरम्यान, एक्झिट पोलच्या अंदाजावर विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

पंतप्रधान मोदींच्या घोषणेचे हे यश : तेजस्वी सूर्या

सर्वच एक्झिट पोलच्या अंदाजात भाजप आणि एनडीएला प्राप्त होणारा विजय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
"अबकी बार ४०० पार" या घोषणेचे यश असल्याचे भाजपचे नेते तेजस्वी सुर्या यांनी म्हटले आहे.

हा तर मोदींच्या एक्झिट पोलचा निकाल : सुप्रिया श्रीनेत

भाजप आणि एनडीएला दाखवित असलेला विजय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या एक्झिट पोलचा निकाल आहे. जनतेच्या खऱ्या निकालात इंडिया आघाडीला २९५ पेक्षाही जास्त जागा मिळतील, असा दावा काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी केला आहे.

एक्झिट पोल पूर्णपणे निराधार : शशी थरूर

हा एक्झिट पोल पूर्णपणे निराधार असून कुठल्याही शास्त्रीय आधारावर तो केला जात नाही, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी केला आहे. मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या वेळी सर्वच एक्झिट पोलचा अंदाज चुकला होता, असेही थरूर यांनी स्पष्ट केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news