पुण्याच्या आगामी निवडणुकीत मनसे लढविणार नवे आक्रमक चेहरे | पुढारी

पुण्याच्या आगामी निवडणुकीत मनसे लढविणार नवे आक्रमक चेहरे

ज्ञानेश्वर बिजले

पुणे : भोंग्याच्या आवाजावरून गेले दोन महिने देशपातळीवर वादळ उठल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेच्या केंद्रस्थानी आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुण्याच्या आगामी निवडणुकीत नवे चेहरे उतरविण्याचे ठरविले आहे. हनुमान जयंतीला पुण्यातील सदाशिव पेठेत मंदिरात पक्ष प्रमुख राज ठाकरे यांनी आरती केली, त्या वेळी निर्माण झालेला भगवा माहौल तरुणाईने भारून गेलेला. याच कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी राज यांना हिंदू जननायक ही नवी उपाधी दिली.

त्यांनी भगवी शाल पांघरली. राष्ट्रीय स्तरावरील माध्यमांनी या कार्यक्रमाची दखल घेतली. दुसर्‍याच दिवशी त्यांनी पुण्यात जाहीर केले, ते अयोध्येला जाण्याचे. राज ठाकरे यांनी कधीही आघाडी करण्याबाबत भाष्य केलेले नाही. स्वबळावर लढण्याची त्यांची सूचना अमलात आणण्याची तयारी पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी सुरू केली आहे. पक्षाने गेले सहा महिने प्रत्येक प्रभागात फिरून शाखाप्रमुखांपासून विभाग प्रमुखांपर्यंतची पदे भरली.

‘पाया’त अडकले गदिमांचे स्मारक; भूमिपूजनानंतर सव्वा वर्ष उलटूनही प्रकल्प रेंगाळलेलाच

नव्या चेहर्‍यांना, तरुणाईला संधी मिळाली. त्याचे दृष्य परिणाम दिसले ते ठाकरे यांच्या सभेत आणि कार्यक्रमांत. मनसेच्या स्थापनेनंतर 2007 त्या निवडणुकीत पुण्यात आठ नगरसेवक निवडून आले. सर्व प्रस्थापितांना धक्का देत, त्यांनी 2012 मध्ये 29 जागा जिंकत महापालिकेत मुख्य विरोधी पक्षाचे स्थान मिळविले. त्यानंतर पक्षांतर्गत काही नगरसेवकांत मतभेद झाले. 2014 मध्ये मोदी लाट आली.

काहीजण भाजपमध्ये गेले. त्या लाटेत सर्व विरोधी पक्षाबरोबरच मनसेचीही वाताहात झाली. 2017 मध्ये चार सदस्यांच्या प्रभागांत लढताना मनसेचे दोनच नगरसेवक निवडून आले. कोमेजलेल्या मनसेत पुन्हा जान आली ती गेल्या सहा महिन्यांत ठाकरे यांनी दरमहा दोन-तीन वेळा पुण्यात येऊन कार्यकर्त्यांशी थेट संपर्क साधल्यानंतर. पक्षबांधणी झाली.

अनेक माजी नगरसेवक, ज्येष्ठ कार्यकर्त्यांसोबतच आक्रमक नवे चेहरे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीला लागले. किशोर शिंदे, बाबू वागसकर, रणजित शिरोळे, साईनाथ बाबर, हेमंत संभूस, अनिल राणे, कैलास दांगट, अस्मिता शिंदे यांच्यासह अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते प्रभागात रणनिती आखण्यात मग्न झालेले दिसून येतात. मनसेने शहराच्या सर्व भागात त्यांच्या संभाव्य उमेदवारांची यादी तयार केली आहे. आघाडी झाल्यास, निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातही काही जण पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे.

कोरोना नियम न पाळणार्‍यांना विमानातून हाकलून द्या : हायकोर्ट

संभाव्य उमेदवारांबाबत चर्चा करण्यासाठी स्थानिक नेत्यांच्या समितीची रविवारी (दि. 5) बैठक होत आहे. मनसेचे किती निवडून येणार, यावर सध्यातरी अंदाज बांधता येणार नाही. मात्र, मनसेच्या उमेदवारांचा फटका कोणाला बसणार, याची चर्चा दबक्या आवाजात विरोधी पक्षांत सुरू झाली आहे. कोथरूड मतदारसंघातील प्रत्येक प्रभागात सर्व जागांवर मनसेकडे संभाव्य उमेदवार सज्ज झाले आहेत.

तेथे तिरंगी लढती झाल्यास, अनेक जागांवर धक्कादायक निकाल लागू शकतील. भाजप व शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या भागात मनसचे नवे फ्रेश चेहरे मुसंडी मारू शकतील का, हाच खरा औत्सुक्याचा प्रश्न आहे. 2012 मध्ये देखील अनपेक्षितपणे मनसेने भल्याभल्यांना पराभूत करीत बाजी मारली होती.

Back to top button