पुणे : ऊसाच्या बैलगाडीला बसविता येणार ‘ब्रेक’? | पुढारी

पुणे : ऊसाच्या बैलगाडीला बसविता येणार 'ब्रेक'?

वडगाव मावळ (जि. पुणे), पुढारी वृत्‍तसेवा : ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडीला ‘ब्रेक’ बसविण्याचे संशोधन मावळ तालुक्यातील संदीप पानसरे यांनी केले. संत तुकाराम साखर कारखान्याच्या मदतीने त्यांनी ही संकल्पना यशस्वी केली. दरम्यान या ब्रेकमुळे बैलांसह बैलगाडी चालक आणि कुटुंबाचाही त्रास कमी होणार आहे.

संदीप पानसरे माध्यंमाशी बोलताना म्‍हणाले, ते त्यांचा मुलगा आयुष कारखान्याच्या रस्त्याने जात असताना ऊसाने भरलेली बैलगाडी रस्त्याच्या उताराने चालली असताना तिला आवरण्यासाठी त्या गाडीवाल्‍याच्या पत्नीचा खटाटोप त्‍यांनी पाहीला. वास्तविक, सर्वच गाडीवानांना रस्त्याच्या उतारावर असा खटाटोप करावा लागतो. गाडीवान गाडीवर असतो तर त्याची पत्नी अथवा सहकारी अशावेळी गाडीच्या टायरला लाकूड लावून गाडी आवरण्याचा प्रयत्न करतो. अशावेळी त्‍या व्यक्तीला अनेक इजा होतात. प्रसंगी धडपडही होते. घर्षणामुळे लाकूड जळते, टायरची झीज होते व इतकेच नाही तर बैल, गाडीवान व लाकूड लावणाऱ्या व्यक्तीला असलेला धोकाही असतोच.

दरम्‍यान, हे चित्र पाहून अचंबित झालेल्या पानसरे पिता-पुत्रांनी यावर पर्याय शोधण्याचा संकल्प केला. त्यानंतर सोनबा गोपाळे यांच्या मदतीने थेट संत तुकाराम साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक यांची भेट घेऊन यासंदर्भात चर्चाही केली.
तसेच, संचालक पठारे यांनीही सहकार्य करण्याचे आश्वासन देऊन त्यासाठी एक बैलगाडी व जागा उपलब्ध करून दिली. त्यानुसार पानसरे यांनी प्रदीप सावंत, किरण वाघोले, विजय मोकाशी यांच्या मदतीने टायरच्या हबवर ब्रेक ड्रम व त्यावर लायनर बसवले. तसेच हा ब्रेक ६ ते ७ फूट उंचीपर्यंतही बसवता येऊ शकतो असे बनवले.

जवळपास २५ ते ३० दिवसांच्या प्रयत्नांनंतर ब्रेक बसवलेली गाडी गायकवाड परिवाराला चाचणी घेण्यासाठी वापरण्यास दिली. महिनाभराच्या कालावधीत तीव्र उतार असणाऱ्या रस्त्याने रिकामी, पूर्ण क्षमतेने भरलेली गाडी नेऊन चाचणी घेतली असता ती यशस्वी झाली.

या कामात महिंद्रा सीआयई कंपनीतील सहकारी विनायक कडसकर, सुधाकर राणे, रवी वैद्य, स्वप्नील पाटील, तुषार कुलकर्णी, नितीन सोनवणे यांनीही सहकार्य केल्याचे पानसरे यांनी सांगितले.
या नव्या प्रयोगाचा फायदा प्रामुख्याने बैलजोडी व संबंधित गाडीवाणाला होणार असून टायरचे होणारे नुकसानही थांबणार आहे. याचा फायदा कारखाना व्यवस्थापनालाही होणार असून इतर कारखान्यांनी या ‘ब्रेक’ असलेल्या बैलगाडीचा वापर केला तर निश्चित फायदा होईल.
साहेबराव पठारे, कार्यकारी संचालक, श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना

बैलगाडीला ब्रेक बसविण्याची प्रक्रिया अत्यंत अल्पखर्चात व जास्तीत जास्त फायदेशीर असून यामुळे बैल घसरून पडणे, टायरला लाकूड लावताना अपघात होणे हे पूर्णपणे बंद होणार असल्याने बैलजोडी व त्या गाडीवान कुटुंबाचे सरंक्षण होणार आहे.
संदीप पानसरे 

हेही वाचा  

Back to top button