महुआ मोईत्रा म्हणाल्या, “जेव्हा माझं मन होईल, तेव्हा मी मटण खाऊ शकते” | पुढारी

महुआ मोईत्रा म्हणाल्या, "जेव्हा माझं मन होईल, तेव्हा मी मटण खाऊ शकते"

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : दिल्लीच्या एका भागामध्ये नवरात्रीपर्यंत मटणाची दुकाने बंद करण्याचे आदेश काढण्यात आला आहे. या आदेशाचं पालन न करणाऱ्यांना दंड ठोठावला जाणार आहे. दक्षिण दिल्ली महानगरपालिकेचे महापौर मुकेश सुर्यान यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे ९ दिवस दारूची दुकानं बंद करण्याचाही आग्रह केला आहे. या आदेशानंतर सोशल मीडियावर मोठा वादविवाद दिसून आला. यामध्ये महुआ मोईत्रा आणि उमर अब्दुल्ला यांनाही आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

यावर तृणमूल काॅंग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी मटण दुकाने बंद करण्याच्या निर्णयावर ट्विट केले आहे की, “मी दक्षिण दिल्लीत राहते. संविधान मला माझ्या इच्छेनुसार मटण खाण्याचे परवानगी देते आणि दुकानदारांना मटणाचे दुकाने चालविण्याचे देखील स्वातंत्र्य देते. फुल स्टाॅप”, अशा आशयाचे ट्विट मोईत्रा यांनी केले आहे, त्यावर नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया दिसून येत आहेत.

त्यानंतर जम्मू-काश्मीर माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी ट्विट करून या आदेशावर निशाणा साधला आहे. ते ट्विटमध्ये म्हणाले आहे की, “रमजान दरम्यान आम्ही मुस्लीम सुर्योदपासून सुर्यास्तापर्यंत काहीही खात नाही. अशात जर आम्ही सर्व बिगरमुस्लीम नागरिकांना आणि पर्यटकांना सार्वजनिक ठिकाणी जेवण करण्यावर बंदी घातली, तर माझ्या हिशेबाने ते ठीक राहील. विशेष करून मुस्लीमबहुल परिसरात ही बंदी घालावी. जर दक्षिण दिल्लीत बहुसंख्यांकवादी बरोबर असेल तर जम्मू-काश्मीरमध्येही बरोबर असेल”, अशा आशयाचे ट्विट अब्दुल्ला यांनी केले आहे.

दक्षिण दिल्लीच्या महानगरपालिकेचे महापौर मुकेश सुर्यान यांनी सांगितले आहे की, “नवरात्री दरम्यान दिल्लीच्या ९९ टक्के घरांमध्ये लसूण आणि कांदादेखील कापला जात नाही. त्यामुळे आम्ही निर्णय घेतला आहे की, नवरात्री दरम्यान दक्षिण एमसीडीमध्येच मटणाची दुकाने खुली राहतील. जो आदेशाचा भंग करेल, त्याला दंड ठोठावला जाईल. ९ दिवस दारुची दुकानेही बंद करण्याची विनंती मुख्यमत्र्यांना केलेली आहे. कदाचित दारूची दुकानेही बंद होतील.”

हे वाचलंत का? 

Back to top button