पुणे : अफूच्या रॅकेटची चिरफाड होणार का ? | पुढारी

पुणे : अफूच्या रॅकेटची चिरफाड होणार का ?

पुढारी विशेष : बापू जाधव

निमोणे : प्रगत समाजात कोणत्याही व्यसनाचे कधीही समर्थन होऊच शकत नाही. मात्र, पारंपरिक पीकपध्दतीत जर व्यवस्था नशा शोधू लागली, तर मात्र मोठा अनर्थ होतो. मागील एक महिन्यापासून जिल्ह्यात कोणत्या ना कोणत्या कोपऱ्यात  पोलिस अधिकाऱ्यांनी अफूच्या (Opium Racket ) शेतीवर कारवाई करणे सुरू केले आहे. या अफूचे रॅकेट पूर्णपणे उद्ध्वस्त करणे आता गरजेचे झाले आहे.

Opium Racket नशेचा बाजार 

शेतात पाच-पंचवीस खसखसीची बोंडे मिळाली. सरकारी नियमाप्रमाणे काही लाखांत त्याची किंमत ठरली. मात्र, ज्या शेतकऱ्यांना नशेचे सौदागर म्हणून गजाआड केले, त्यांचे म्हणणे आहे की, आम्ही हा खटाटोप जिभेचे चोचले पुरविण्यासाठी केला. खसखस ही सुगरणीची खास पेशकश असल्यामुळे आम्ही या वाटेला गेलो, तर सरकार म्हणते हा सगळा नशेचा बाजार आहे.

 एका क्षणात आंतरराष्ट्रीय नशेचा सौदागर

मान्य आहे अफूची बोंडे शेतात सापडली. कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल झाला. कालपर्यंत गावच्या दृष्टीने भोळाभाबडा असणारा शेतकरी एका क्षणात आंतरराष्ट्रीय नशेचा सौदागर झाला. परंतु, मागील पाच वर्षांत ज्या ज्या शेतकऱ्यांच्या शेतात अफू सापडली, त्यांना अटक केली. त्या गुन्ह्यातील तपासात नक्की कसले रॅकेट हाती लागले, हे पोलिसांना शोधता आले का? पिकवणारा सापडला; पण विक्री करणारा, त्याची वाहतूक करणारा कोणी सापडला असेल तर ते आजपर्यंत पोलिस यंत्रणा जाहीर का करीत नाही. दररोज राज्यात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ सापडतात. पण त्या गुन्ह्याच्या तळाला गेले तरी एकाही शेतकऱ्याचे नाव का पुढे येत नाही,  असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

शेतकऱ्यांवर चुकीने तर कारवाई केली जात नाही ना!

शेजारी-भावकीतील वाद किंवा गावगाड्यातील राजकारणातील टोकाचे मतभेद असले, तर एखाद्याची खोड मोडण्यासाठी जाणीवपूर्वक त्याच्या शेताची टेहळणी केली जाते. बहरात आलेली बोंडे हेच पुढच्याच्या जीवनाची राखरांगळी करेल, याचा अंदाज असलेली माणसे खुबीने पोलिस यंत्रणेला या घटनेची माहिती देतात. पोलिसांची धाड पडली. मुद्देमाल सापडला की सगळीकडे डंका होतो. ज्याच्या शेतात बोंडे सापडली त्याचे आयुष्य बरबाद होऊन जाते. तो थेट आंतरराष्ट्रीय अमलीतस्कर ठरवला जातो. हे महिनोन्महिने असेच सुरू आहे. ज्या तपास यंत्रणेने हे छापा सत्र मारले, त्यांनी या बोंडांवर प्रक्रिया करणारे, अमली पदार्थाची साखळी असलेल्या गटात कधीतरी शेतकऱ्यांचा नक्की किती सहभाग आहे, हे जाहीर करण्याची वेळ आली आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button