पुणे : शिरवली बंधाऱ्यातून दूषित पाण्याची गळती

पुणे : शिरवली बंधाऱ्यातून दूषित पाण्याची गळती

सांगवी : अनिल तावरे

शिरवली बंधाऱ्यात पाणी अडविताना हलगर्जीपणा केल्याने या बंधाऱ्याच्या सुमारे ११ दरपांतून ५०० एचपी एवढ्या दूषित पाण्याची मोठ्या प्रमाणावर गळती होत आहे. हेच शिरवली बंधाऱ्यातील दूषित पाणी निरावागज बंधाऱ्याच्या नदीतील पाणलोट क्षेत्रात मिसळून पाणी दूषित झाले आहे.

शिरवली व निरावागज बंधाऱ्यावर हजारो एकर शेतजमीन ओलिताखाली आली आहे. दूषित पाण्यामुळे नदीतील बहुतांश जमिनी क्षारपड होत असल्याने नापिक होऊ लागल्या आहेत. निरा नदीकाठावर सांगवी, शिरवली, खांडज व निरावागज ही गावे वसली आहेत. वरील दोन्ही बंधाऱ्यातील पाण्यााला उग्र वास सुटला आहे. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे. सायंकाळी व रात्री वातावरण शांत झाल्यावर नदीकाठच्या नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. पाणगवत जळून गेले आहे.

तसेच बंधाऱ्यातील पाणी शेतीला दिल्यास पिकांची वाढ खुंटते आहे. हे दूषित पाणी माणसांच्या किंवा जनावरांच्या संपर्कात आल्यावर अंगावर जखमा होत आहेत. दोन्ही बंधाऱ्यातील जलचर नष्ट होत आहेत. या गंभीर समस्येबाबत सांगवी येथे ३ जानेवारी रोजी झालेल्या ग्रामसभेत दूषित पाण्याचा बंदोबस्त करण्यासाठी एकमुखी ठराव संमत करण्यात आला होता. त्यानुसार ग्रामपंचायतीने प्रदूषण नियंत्रण मंडळ, पुणे व सातारा येथील कार्यालयात लेखी पत्रव्यवहार केला आहे. परंतु दोन महिने उलटले तरी एकाही मंडळाचे अधिकारी फिरकले नाहीत. उलट पत्रव्यवहार केल्यापासून जास्तच पाणी दूषित सोडण्यास सुरुवात झाली.

बारामती तालुक्यात एखाद्या रेल्वेत बसतील एवढे पदाधिकारी आहेत, परंतु एकाही पदाधिकाऱ्यांना या गंभीर प्रश्नावर विचारपूस करायला वेळ मिळत नसल्याचे दुर्भाग्य आहे. शिरवली बंधारा जीर्ण झाला आहे. या बंधाऱ्याचे खांब, पाणी अडविताना ज्या ठिकाणी दरपे बसवतात त्या खाचींना भगदाडे पडली आहेत. या बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध झाला आहे. मात्र, काही ठेकेदारांच्या स्वार्थासाठी निविदेची प्रक्रिया झाली नसल्याची दबक्या आवाजात चर्चा केली जात आहे. एकूणच अधिकारी, पदाधिकारी व काही ठेकेदारांच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांना व शेतकऱ्यांना नरकयातना भोगाव्या लागत आहेत.

…तर पाणीपट्टी व वीजबिल मागता कशाला ?

शिरवली व निरावागज बंधाऱ्यातील पाणी दुषित झाल्याने शेतीसाठी उपयोग होत नाही. या पाण्याने एकरी उत्पादन कमी निघत आहे. तसेच शेतीला पाण्याचा उपयोग होत नसल्याने वीजपंप बंद आहेत. मग शेतीच्या पाण्याची पाणीपट्टी व पंपांचे वीजबिल मागता कशाला, असा सवाल शेतकरी करू लागले आहेत.

logo
Pudhari News
pudhari.news