

सातारा पुढारी वृत्तसेवा : टोलनाका कर्मचार्यांच्या दादागिरीपासून ते बनावट पावत्या वाहनचालकांना लुबाडण्याच्या अनेक घटनांमुळे कायमच चर्चेत असलेल्या खेड शिवापूर टोलनाक्याचा एक नवा झोल समोर आला आहे.
सातारा शहरातील शाहूपुरी या उपनगरात गाडी दारात उभी असताना या गाडी नंबरच्या मालकाच्या बँक खात्यातून 100 रुपये वसूल केल्याचा मेसेज गंगाधर रामचंद्र विभुते यांना आला. पार्कींगमध्ये असलेल्या वाहनाने प्रवास करून टोल भरल्याचा संदेश आल्याने ते चक्रावून गेले.
गंगाधर विभुते हे सातार्यातील शाहूपुरी येथील सुयोग कॉलनी येथे राहतात. दि. 8 रोजी संध्याकाळी 6 वाजता त्यांच्या मोबाइलवर खेड शिवापूर टोलनाक्याचा एक मेसेज आला. या मेसेजमध्ये त्यांच्या मालकीच्या एम. एच.50 ए. 0743 या गाडीमालकाच्या खात्यातून टोल वसुली म्हणून 100 रुपये वजा करण्यात आले आहेत.
ज्या दिवशी हा मॅसेज आला त्या दिवशी त्यांची गाडी दिवसभर पार्किंगमध्ये उभी होती. गाडी सातार्यात असताना ती राष्ट्रीय महामार्गावरील खेड शिवापूर टोलनाक्यांवर कशी गेली? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
माझी गाडी घरात असताना टोलनाका व्यवस्थापनाने 100 रूपये कसे व का कापले? असे सवालच विभुते यांनी उपस्थित केले आहेत. गाडी पास झाली असल्यास सीसीटीव्ही मध्ये हे दाखवून द्यावे, असे आव्हानही त्यांनी दिले आहे.
या मॅसेजनुसार विभुते यांची गाडी दुपारी 12 वाजता खेड शिवापूरच्या टोलनाक्यावर होती. याचा मोठा पुरावा त्यांच्याकडे उपलब्ध आहे. त्यांच्या हातून सातार्यात त्याचवेळी एखादा मोठा अपघात झाला असता तर टोलनाक्याच्या मॅसेजमुळे त्यांची सहज सुटका झाली असती.
तसेच अन्य कोणतीही गाडी पास करून त्यांच्या गाडीच्या नावाने टोल फाडल्याने कोणताही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, खेड शिवापूर टोलनाक्यावरून जर दिवसभरात 100 गाड्यांचे असे 100 रुपये काहीही कारण नसताना कापून घेतले जात असतील तर महिन्यात 30 हजार गाड्यांचे तब्बल 3 लाख रुपये टोलनाक्याच्या खात्यात जमा होतात की काय? असा सवाल केला जात आहे.
हा झोल मागील किती दिवसांपासून सुरू आहे हे नेमके माहिती नाही. या प्रकारामुळे कोट्यवधींची लूट केली असण्याची शक्यता आहे.
सातारा वगळता दुसर्या शहरातील एखाद्या गाडी मालकाच्या खात्यातून 100 रुपये खेड-शिवापूर टोलनाक्याच्या खात्यावर वर्ग झाले. तर तो 100 रुपयांसाठी हजारो रुपयांचे पेट्रोल-डिझेल खर्च करून याचा जाब विचारण्यासाठी येणार आहे का? आणि याचाच गैरफायदा घेत टोलनाका व्यवस्थापनाच्या कर्मचार्याने पैसे कमावण्याचा हा नवा फंडा शोधून काढला असण्याची दाट शक्यता आहे.