पालघर : मुंबई-अहमदाबाद महामार्ग बनलाय मृत्यूचा सापळा | पुढारी

पालघर : मुंबई-अहमदाबाद महामार्ग बनलाय मृत्यूचा सापळा

डहाणू ; विनायक पवार :  भारताचे प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्रीच्या अपघाती मृत्यूनंतर मुंबई-अहमदाबाद महामार्गाच्या दुरवस्थेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या हजारो वाहनांकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण दरवर्षी टोलच्या माध्यमातून हजारो कोटींची बक्कळ वसुली करून देखील महामार्गावर सुरक्षिततेच्या आवश्यक उपाययोजना करीत नसल्यामुळे वारंवार अपघात होऊन
दुर्दैवी बळी जात आहेत. घोडबंदर रोड वरसावे गाव ते गुजरात सीमेवरील अच्छाडपर्यंत मुंबई-अहमदाबाद महामार्गाचा 119
किमीचा भाग हा पालघर जिल्हा हद्दीत समाविष्ट आहे. जुलै अखेरपर्यंत 7 महिन्यांत शासकीय आकडेवारीनुसार 177 अपघाती घटनांमध्ये 62 जणांचा बळी गेला आहे तर शेकडो जण गंभीर जखमी होऊन काही जणांना कायमचे अपंगत्व आलेले आहे.

मुंबई-अहमदाबाद महामार्ग हा सरळसोट असून या महामार्गावर कुठेही मोठा घाट आणि वेडीवाकडी वळणे नसल्याने वाहने अतिवेगात असतात. त्याचप्रमाणे दिल्ली, राजस्थान गुजरात आणि महाराष्ट्राला जोडणार्‍या या महामार्गावर हजारो प्रवासी आणि मालवाहू अवजड
वाहनांची वर्दळ सुरू असते. टाटा सन्सचे माजी अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा रविवारी मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील चारोटी जवळ दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला. गुजरातमधील उदवाडा येथून मुंबईकडे येताना त्यांची मर्सिडीज कार सूर्या नदीच्या पुलाच्या कठड्याला धडकून हा अपघात झाला होता. या भीषण अपघातात कारच्या मागच्या सीटवर बसलेले सायरस मिस्त्री आणि जहांगीर पंडोल यांचा जागीच मृत्यू झाला तर कार चालवत असलेल्या डॉ.अनायता पंडोल आणि त्यांचे पती दारीयस पंडोल हे गंभीर जखमी आहेत.

खड्ड्यांमुळे हायवेची वाताहत

मुंबई-अहमदाबाद हायवेवर घोडबंदर फाउंटन हॉटेल ते गुजरात सीमेवरील अच्छाडपर्यंत जीवघेणे खड्डे पडल्याने हायवेची अक्षरक्ष वाताहात झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि टोल वसुली करणार्‍या ठेकेदार कंपनीने हायवेची नियमित देखभाल दुरुस्ती आणि सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केल्याने दिवसेंदिवस अपघातात वाढ होऊन नागरिकांचे बळी जात आहेत तर अनेक जण गंभीर जखमी होत आहेत

महामार्गावरील अपघातांची ठिकाणे

  • मुंबई- अहमदाबाद महामार्गावर शिरसाड फाटा ते अच्छाड पर्यंत 29 अपघातप्रवण ठिकाणे चिन्हांकीत करण्यात आली आहेत.
  • सकवार उड्डाणपूल, ढेकाळे वाघोबा खिंड, वरई फाटा उड्डाणपूल,-सातीवली क्रॉसिंग, हालोली गाव, मॅकडोनाल्ड पाटील पाडा, दुर्वेस वैतरणा नदी पूल,-मस्तान नाका पूल, जव्हार फाटा क्रॉसिंग, नांदगाव क्रॉसिंग, आवढाणी क्रॉसिंग, मेंढवण खिंड, मेंढवण वळण, सोमटा पूल, तवा गाव क्रॉसिंग, सूर्या नदी पूल, चारोटी फ्लायओवर, एशियन पेट्रोल पंप क्रॉसिंग, महालक्ष्मी मंदीर उड्डाणपूल, धानीवरी
    गाव, आंबोली वळण, आंबोली क्रॉसिंग, वडोली क्रॉसिंग, सूत्रकार फाटा, सावरोली गाव सारख्या सातत्याने अपघात होत असलेल्या जागांचा समावेश आहे.
  • अनेक ठिकाणी पेट्रोल पंप आणि हॉटेल चालकांनी स्वत:च्या फायद्यासाठी महामार्गावर अनधिकृत कट आणि क्रॉसिंग तयार केले असून या सर्व गैरप्रकारांविरोधात तक्रारी करून सुद्धा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि पोलिस दुर्लक्ष करीत आहेत.

 

Back to top button