सात बिबटे पकडण्यात वन विभागाला यश; वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांची माहिती

सात बिबटे पकडण्यात वन विभागाला यश; वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांची माहिती
Published on
Updated on

नारायणगाव / ओतूर : पुढारी वृत्तसेवा : काळवाडी (ता. जुन्नर) हद्दीत वन विभागाने लावलेल्या पिंजर्‍यात सातवा बिबट्या पकडण्यात यश आले आहे. बुधवारी (दि. 15) रात्री 9 च्या सुमारास हा बिबट्या पिंजर्‍यात अडकला. त्यास माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात ठेवण्यात आला आहे. गेल्या 10 दिवसांत एकूण 7 बिबटे पकडण्यात आले असून, त्यामध्ये हल्ला करणार्‍या बिबट्यांचा समावेश असल्याची शक्यता आहे, अशी माहिती वन क्षेत्रपाल वैभव काकडे यांनी दिली.

काळवाडी येथे दि. 8 मे रोजी रुद्र फापाळे या 8 वर्षांच्या बालकाला बिबट्याने हल्ला करून ठार केले होते. त्या वेळी वन विभागाने तत्काळ परिसरात पिंजरे व ट्रॅप कॅमेरे लावले आहेत. तसेच वरिष्ठ अधिकार्‍यांसह पथके कार्यरत आहेत. वन विभागाने गेल्या 10 दिवसांपासून परिसरात लावलेल्या पिंजर्‍यात हा सातवा बिबट्या अडकला आहे. परिसरात कोणाला बिबट्या आढळला तर वन कर्मचार्‍याशी संपर्क साधावा, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.

अफवांवर विश्वास ठेवू नका

येडगाव येथील सह्याद्री पुलावर वन विभागाने 3 बिबट सोडल्याची अफवा पसरली. एका स्थानिक यूट्यूब चॅनेलने त्याला प्रसिध्दी दिली. यामुळे काळवाडी व पिंपरी पेंढार येथे सोडलेल्या बिबट्यानेच हल्ले केले असा गैरसमज निर्माण झाला. यामुळे वन विभागाबाबत नागरिकांमध्ये संताप दिसून आला. यामुळे वन कर्मचारी यांना शासकीय कामात अडथळा करून मारहाणदेखील करण्यात आली. यामध्ये एक महिला वनरक्षक जखमी झाली आहे. नागरिकांनी चुकीच्या बातम्या व अफवांवर विश्वास ठेवू नये. नागरिकांनीदेखील अफवा पसरवू नये. वन विभाग बिबट समस्या सोडविण्यास नक्कीच प्रयत्नशील आहे. वन विभागाने दिवसरात्र काम करून बिबटे जेरबंद करून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.

ओतूर वनपरिक्षेत्रांतर्गत बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने 40 पिंजरे, 20 ट्रॅप कॅमेरे, ड्रोन सर्वेक्षण, जनजागृती, दिवसरात्र पथकांची गस्त सुरू आहे. वन विभागाच्या बिबटे पकडण्याच्या मोहिमेला यश येत आहे. आतापर्यंत एकूण 7 बिबटे पिंजर्‍यात जेरबंद झाले आहेत. ही मोहीम सुरूच राहणार आहे.

– वैभव काकडे, वनपरिक्षेत्र अधिकारी, ओतूर.

गेल्या 10 दिवसांत बिबट्याने केलेले हल्ले

लेंडेस्थळ, पिंपळवंडी येथे शेतात काम करणार्‍या प्रियंका मनोज हुलवळे यांच्यावर दि. 5 मे रोजी सायंकाळी बिबट्याने हल्ला केला. त्यानंतर दि. 8 मे रोजी सकाळी 8 च्या सुमारास रुद्र महेश फापाळे (रा. काळवाडी, ता. जुन्नर) या 8 वर्षांच्या बालकावर बिबट्याने हल्ला केला, त्यात त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर दि. 10 मे रोजी नानुबाई सीताराम कडाळे (रा. गाजरपट, पिंपरी पेंढार) या शेतात काम करणार्‍या महिलेचा बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news