बेकायदा होर्डिंग; अपघातांना निमंत्रण : चाकण परिसरातील चित्र

बेकायदा होर्डिंग; अपघातांना निमंत्रण : चाकण परिसरातील चित्र

चाकण : पुढारी वृत्तसेवा : मागील वर्षी महाकाय होर्डिंग चाकण वाहतूक विभागाच्या पोलिस चौकीवर कोसळल्याची धक्कादायक घटना पुणे-नाशिक महामार्गावरील स्पायसर चौक भागात घडली होती. असेच धोकादायक होर्डिंग पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग आणि तळेगाव-चाकण ते शिक्रापूरदरम्यानच्या अनेक ठिकाणी आजही उभे आहेत. वादळी वारे आणि मुसळधार पावसात यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशा घटनेची पुनरावृत्ती चाकणमधील राष्ट्रीय महामार्गावर कधीही होऊ शकेल अशी परिस्थिती आहे.

काही दिवसांपूर्वी वादळी पावसाने चाकणमध्ये होर्डिंगमुळे 46 हजार ग्राहकांची वीज खंडित झाल्याची बाब समोर आली होती. वीजवाहक तारांवर खांब पडल्याने या भागातील सुमारे 46 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा विस्कळीत झाल्याची आकडेवारी महावितरणकडून देण्यात आली होती. मात्र, अशा बेकायदा होर्डिंग उभारणार्‍या मंडळींवर एकदाही कारवाई झालेली नाही. त्यामुळे त्यांचे चांगलेच फावले असून, दिवसागणिक अशा बेकायदा होर्डिंगमध्ये वाढ होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

पुणे-नाशिक व तळेगाव-चाकण ते शिक्रापूरदरम्यानच्या महामार्गालगत असलेो बहुतांश होर्डिंग बेकायदा आहेत. यातील अनेक होर्डिंगला बंधनकारक असलेले स्थैर्य प्रमाणपत्र म्हणजे स्टॅबिलिटी सर्टिफिकेट नसल्याची वस्तुस्थिती वारंवार समोर येत आहे. त्यामुळे ही होर्डिंग एकीकडे शहराचे विद्रुपीकरण आणि दुसरीकडे नागरिकांच्या जीविताला थेट धोकादायक ठरणारी आहेत. ऊन तसेच पावसात गंजून कमकुवत झालेले होर्डिंग कोसळण्याचा धोका या भागात निर्माण झाला आहे. कोट्यवधी रुपयांची कमाई होत असल्याने आणि बड्या राजकीय मंडळीचा पाठिंबा मिळत असल्याने साक्षात मृत्यूचे सापळा असलेले हे होर्डिंग उभे असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. अनेकदा तक्रारी होऊनही याबाबत ठोस कारवाई होत नसल्याची स्थिती वारंवार समोर येत आहे.

त्यांचे बेकायदा होर्डिंगला पाठबळ

चाकण शहर आणि पंचक्रोशीतील विविध भागांत तसेच वाड्यावस्त्यांवर फलकबाजी केली जात आहे. यात खून, खुनाचे प्रयत्न असे अत्यंत गंभीर गुन्हे, शिक्षा झालेल्या आणि तडीपारीच्या कारवाईला साजसे कर्तृत्व असलेल्या आणि चाकण एमआयडीसीमध्ये वेगवेगळी चुकीची कामे करणार्‍या कुख्यात गुन्हेगारांचे उद्दात्तीकरण होत असल्याचे दिसून आले आहे. कुख्यात गुन्हेगारांना शुभेच्छांचे फलक लावून दहशत माजवली जात आहे. चौकाचौकांत असे फलक उभारून चौक विद्रूप केले जात आहेत. राजकीय नेत्यांचे वाढदिवस, राजकीय कार्यक्रम, पूजा, क्रिकेटचे सामने, जाहिरातींपासून निधन- दशक्रिया यांच्यासह विविध सणांच्या शुभेच्छांचे फलक लावण्यात येत आहेत. यात भर म्हणून आता लग्न व साखपुड्यानिमित्तही भावी वधू-वरांचे फोटो असलेले भले मोठे फ्लेक्स लावण्यात येऊ लागले आहेत. प्रशासन याकडे सपशेल दुर्लक्ष करत आहे.

कारवाईची मागणी

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा लावण्यात आलेल्या बेकायदा अजस्र लोखंडी सांगाडे असलेल्या फ्लेक्स, होर्डिंग, एलइडी स्क्रीनमुळे वाहनचालक आणि पादचार्‍यांची डोकेदुखी वाढली आहे. कोणतेही तारतम्य न बाळगता लावलेले हे शेकडो फलक अपघातांना कारणीभूत ठरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या पद्धतीने अनधिकृत होर्डिंगचे सांगडे उभारणार्‍या मंडळींवर कठोर कारवाई करण्याची मागणी चाकण पंचक्रोशीतील नागरिकांतून होत आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news