पालघर : जव्हार रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञाची वानवा | पुढारी

पालघर : जव्हार रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञाची वानवा

जव्हार; पुढारी वृत्तसेवा :  जव्हार ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ हे पद रिक्त असल्याने आदिवासी गर्भवती महिलांचे उपचारांअभावी हाल होत आहेत. अनेक रुग्णांची वेळेत तपासणी होत नसल्याने अडचण निर्माण झाली आहे. ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ हे रिक्त पद तत्काळ भरण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. जव्हार हा 99 % आदिवासी लोकवस्ती असलेला तालुका आहे. याठिकाणी आरोग्य सेवेचा बोजवारा उडाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

काही दिवसांपूर्वी मोखाडा तालुक्यातील मरकटवाडी या आदिवासी पाड्यावर उपचाराअभावी एका गर्भवती मातेच्या नवजात जुळ्या
अर्भकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर आरोग्य यंत्रणेला जाग आली. जव्हार रुग्णालय येथून स्त्रीरोग तज्ज्ञाला उचलून, मोखाडा येथील रुग्णालयात रिक्त असलेली स्त्रीरोग तज्ज्ञाची जागा भरण्यात आली आणि जव्हारच्या ग्रामीण रुग्णालयात
पुन्हा स्त्रीरोग तज्ञाची रिक्त जागा झाली आहे. जव्हार ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञाची जागा रिक्त करून मोखाड्याची जागा भरण्यात आली. जव्हारच्या पतंगशहा कुटीर रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.भरत महाले यांची बदली मोखाडा रुग्णालयात करण्यात आली, त्यामुळे
जव्हार रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञाची जागा रिक्त झाली आहे.

जव्हार रुग्णालय हे उपजिल्हा रुग्णालय असून जव्हार, मोखाडा, विक्रमगड व वाडा या आदिवासी तालुक्यातील एकमेव असे मोठे रुग्णालय आहे. या तालुक्यातील गरोदर माता या ठिकाणी उपचार घेण्यासाठी येत असतात. मात्र महिनाभरापासून पंधरा दिवसापासून स्त्रीरोग तज्ज्ञ नसल्याने प्रसुतीसाठी आलेल्या रुग्णांना शस्त्रक्रियेची सोय नसल्यामुळे नाशिक या ठिकाणी पाठविण्यात येत आहे.

ग्रामीण रुग्णालयात गेल्या पंधरा दिवसांत 4 गरोदर मातांना शस्त्रक्रियेसाठी नाशिक येथे पाठविण्यात आले, दोनच दिवसांपूर्वी कशिवली येथील गरोदर महिलेला प्रसुतीसाठी जव्हार रुग्णालयात भरती करण्यात आले होते, परंतु सदर महिलेवर सीझरींगची शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते परंतु स्त्रीरोग तज्ञांच्या अभावामुळे सदर महिलेला इतर ठिकाणी हलविण्याचा सल्ला जव्हार रुग्णालयाने दिल्यानंतर सदर महिलेला वाडा येथे एका खासगी हॉस्पीटलला नेण्यात आले. विशेष म्हणजे बहुतांशी गरोदर मातांना नाशिक येथे उपचारासाठी पाठविण्यात येते मात्र नाशिक ते जव्हार हे अंतर दोन तासांचे असल्याने रुग्णवाहिकेमधून जाताना गरोदर रुग्णांचे हाल होत आहेत.
तसेच वाटेत काही दुर्घटना देखील घडण्याची शक्यता आहे. रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णालय परिसरात व्हरांड्यात झोपावे लागते,
यामुळे जव्हारच्या रुग्णालयात तातडीने स्त्रीरोग तज्ज्ञाची जागा भरावी अशी मागणी ग्रामीण जनतेतून केली जात आहे

समस्या कायम…

विशेष म्हणजे नाशिक या ठिकाणी रुग्णांच्या नातेवाईकांना देखील तारेवरची कसरत करून कोणतीही सोय नसल्याने,
गरीब परिस्थितीमुळे परिणामी व्हरांड्यात झोपावे लागते,ही समस्या कायम आहे. जव्हारच्या रुग्णालयात तातडीने स्त्रीरोग
तज्ज्ञाची जागा भरावी अशी मागणी ग्रामीण जनतेतून केली जात आहे.

Back to top button