नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : गतवर्षी पाऊस कमी झाल्याने आणि उन्हाळा अतिशय कडक असल्याने कुकडी प्रकल्पातील पाणीसाठा प्रचंड कमी झाला आहे. सध्या कुकडीमध्ये केवळ 9.11 टक्के इतकेच पाणी शिल्लक राहिले आहे. त्यामुळे अर्धा मे महिना, त्यानंतर जून व जुलैअखेर हे पाणी कसे पुरणार? अशी चिंता शेतकरीवर्गाला लागली आहे. कुकडी प्रकल्पांंतर्गत डिंभा, माणिकडोह, वडज, चिल्हेवाडी, पाचघर, येडगाव ही धरणे आहेत. या 6 धरणांमधील पाण्याचा साठा कमालीचा घटला आहे. उन्हाळा कडक असल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत आहे. सध्या डिंभे धरणातून 400 क्यूसेक्स प्रतिसेंकद वेगाने पाणी येडगाव धरणात सोडले जात आहे. तथापि येडगाव धरणातून देखील 11 नंबर दरवाजाद्वारे कुकडी नदीच्या पात्रातून पूर्व भागातील बंधारे भरण्यासाठी तसेच शिरूर नगरपरिषदेच्या हद्दीतील बंधारे भरण्यासाठी पाणी सोडण्यात आले आहे.
सध्या येडगाव धरणामध्ये अवघा 17.75 टक्के पाणीसाठा आहे, तर माणिकडोह धरणात सर्वात कमी म्हणजे 2.83 टक्के, वडजमध्ये 20.13 टक्के, पिंपळगाव जोगे 3.64 टक्के, डिंभे 13.55 टक्के इतकेच पाणी शिल्लक आहे. येडगाव धरण परिसरामध्ये शेतकर्यांच्या पाइपलाइन आहेत. तसेच कुकडी नदीच्या दोन्ही बाजूने देखील शेतकर्यांचे वीजपंप आहेत. परंतु सध्या धरणातील पाण्याचा साठा कमालीचा कमी झाल्याने शेतकर्यांची मोठी अडचण निर्माण होऊ लागली आहे. पाण्याची पातळी दिवसेंदिवस खाली जात असल्याने शेतकर्यांना वीजपंप नदीपात्रात आतमध्ये नेत अधिकचे पाइप बसवून घ्यावे लागत आहेत.
येडगाव परिसरामध्ये अनेक शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात टोमॅटोची लागवड केली आहे. पाऊस पडेपर्यंत जर धरणात पाणी शिल्लक राहिले नाही; तर करायचे काय? तसेच पाण्याचा साठा कमी झाल्यावर उर्वरित पाणी फक्त पिण्यासाठी राखून ठेवले; तर मात्र पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकर्यांना मोठी धास्ती लागलेली आहे.
येडगाव परिसरातील शेतकर्यांच्या वीजपंपांची केबल चोरीला जाण्याचे प्रकार पुन्हा वाढले आहेत. मागच्या 15 दिवसांपूर्वी 9 ते 10 शेतकर्यांच्या वीजपंपांची केबल चोरीला गेल्याने जवळपास 2 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबतची पोलिसांत तक्रार देऊनदेखील काही उपयोग होत नाही. त्यामुळे अनेकदा शेतकरी पोलिसांत तक्रार देत नाहीत, त्यामुळे चोरट्यांचे चांगलेच फावत आहे.
हेही वाचा