पालघर : वैतरणा नदीपात्रात अडकलेल्या १० कामगारांना सुखरूप बाहेर काढले (व्हिडिओ) | पुढारी

पालघर : वैतरणा नदीपात्रात अडकलेल्या १० कामगारांना सुखरूप बाहेर काढले (व्हिडिओ)

मनोर (ता. पालघर) : नावेद शेख; पालघर जिल्ह्यातील दहिसर-बहाडोली गावादरम्यान वैतरणा नदीपात्रात मुंबई – बडोदा द्रुतगती महामार्गासाठी पुलाचे काम करणारे १० कामगार अडकून पडले होते. या कामगारांना नदीपात्रातून बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आले आहे. गुरुवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पाणीपातळीत घट झाल्याने जी आर कंपनीच्या बोटीतून एनडीआरएफचे जवान बार्जपर्यंत पोहचले होते. बचाव अभियान पूर्ण झाल्याने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, महसूल आणि पोलीस विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. नदी पात्राच्या पाणीपातळीत अचानक वाढ होऊन बार्जचा नांगर तुटल्याने बार्जवरील दहा कामगार नदीपात्रात अडकले होते.

मुंबई बडोदा द्रुतगती महामार्गासाठी दहिसर बहाडोली गावादरम्यान वैतरणा नदीपात्रात पुलाच्या बांधकामासाठी पिलर टाकण्याचे काम सुरू होते. नदीपात्रात मध्यभागी पुलाचे पिलर तयार करण्यासाठी बार्जवर दहा कामगार काम करीत होते. बुधवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास नदीच्या पाण्याच्या प्रवाहात अचानक वाढ झाल्याने बार्जचा नांगर तुटला. एका नांगराच्या आधारावर बार्ज नदीपात्रात हेलकावे खाऊ लागली होती. बार्जवर दहा कामगार असल्याने जी आर कंपनीचे धाबे दणाणले होते.जी आर कंपनीकडून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला संपर्क साधल्यानंतर बुधवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून बचावकार्याला सुरुवात करण्यात आली होती. एनडीआरएफचे पथक, महसूल आणि पोलीस विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते.

संबंधित बातम्या

मुसधार पाऊस आणि रात्रीच्या अंधारात बचावकार्यात अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे कामगारांना बाहेर काढण्यात अपयश आले होते. कोस्टगार्डकडे संपर्क साधण्यात आला होता. परंतु खराब हवामानामुळे बचावकार्य रात्री बारा वाजण्याच्या सुमारास थांबविण्यात आले होते.

गुरुवारी सकाळी सात वाजता पुन्हा बचावकार्याला सुरुवात करण्यात आली होती. जी आर कंपनीच्या बोटीतून एनडीआरएफचे जवान वैतरणा नदी पात्राच्या मध्यभागी असलेल्या बार्जपर्यंत पोहोचले होते. सकाळी आठ वाजेपर्यंत बार्जवर अडकलेल्या दहा कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आले.

जिल्हाधिकारी माणिक गुरसळ, अप्पर पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड, अप्पर जिल्हाधिकारी सुरेंद्र नवले, उपविभागीय अधिकारी धनाजी तोरसकर, तहसीलदार, मंडळ अधिकारी, पोलीस कर्मचारी बचावकार्यादरम्यान घटनास्थळी उपस्थित होते.

 हे ही वाचा :

Back to top button