सूर्यावरील स्फोटातून निघाल्या चार ज्वाळा | पुढारी

सूर्यावरील स्फोटातून निघाल्या चार ज्वाळा

वॉशिंग्टन : सूर्याच्या पृष्ठभागावर चार वेगवेगळ्या ठिकाणी भयानक स्फोट झाले आहेत. एकाच वेळी झालेल्या या स्फोटांमुळे चार सौरज्वाळा निघाल्या. 23 एप्रिलला ही घटना घडली. या घटनेने जगभरातील खगोलशास्त्रज्ञांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘नासा’च्या सोलर डायनॅमिक्स ऑब्झर्व्हेटरीने या स्फोटांचे व्हिडीओ फुटेज जारी केले आहे. या स्फोटांमुळे एक सौरवादळ निर्माण होईल व त्यामुळे पृथ्वीवरील दूरसंचार प्रणाली, उपग्रह सेवा यांच्या कार्यात बाधा निर्माण होऊ शकते, असे म्हटले जात आहे.

एकाच वेळी होणार्‍या अशा स्फोटांना ‘सिम्पॅथेटिक सोलर फ्लेअर’ असे म्हटले जाते. सूर्याच्या पृष्ठभागावर होणार्‍या रेडिएशनच्या शक्तिशाली स्फोटातून ज्या ज्वाळा उठतात, त्यांना सौर ज्वाळा म्हणतात. ज्यावेळी सौर वातावरणात चुंबकीय शक्ती अचानक उत्सर्जित होते, त्यावेळी सौर ज्वाळा निर्माण होतात. या ज्वाळांसोबतच ‘सनस्पॉट’ म्हणजेच सूर्यावरील डागही निर्माण होतात.

‘सनस्पॉट’ सूर्यावरील अशा काळसर डागांना म्हटले जाते जे ज्वाळा चुंबकीय क्षेत्राला धडकल्याने थंड होत असलेल्या ठिकाणांना दर्शवतात. आता ज्याठिकाणी स्फोट झाले ती चारही ठिकाणे एकमेकांपासून हजारो किलोमीटर अंतरावर होती. सर्वसाधारणपणे सिम्पॅथेटिक फ्लेअरच्या घटनांमध्ये दोन ज्वाळा एकमेकांशी जोडलेल्या असतात. मात्र, आता चार-चार ज्वाळा उठल्या असून त्याला ‘सुपर सिम्पॅथेटिक’ म्हटले जात आहे. या स्फोटांची एकूण ताकद किती होती, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Back to top button