कोकण: दरड कोसळून बाप-लेकीचा मृत्यू | पुढारी

कोकण: दरड कोसळून बाप-लेकीचा मृत्यू

खानिवडे; पुढारी वृत्तसेवा: कोकणात सर्वाधिक पाऊस पालघर जिल्ह्यात झाला असून या मुसळधार पावसाचा फटका वसई तालुक्याला बसला आहे. वसई पूर्वेच्या वाघराल पाडा येथे चाळींवर दरड कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर कुटुंबातील दोघांना वाचवण्यात यश आले आहे. वडील आणि मुलगी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडले असून आई आणि 10 वर्षांचा मुलगा बचावला आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच याच परिसरातील चार घरांमधील 10 जण किरकोळ जखमी झाले आहेत. मृतांच्या नातेवाईकांना 4 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

पालघर जिल्ह्यात गेले चार दिवस मुसळधार पाऊ स आहे. गुरुवारपर्यंत अतिवृष्टीचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. बुधवारी सकाळी साडेसहा वाजता धुवांधार बरसलेल्या पावसात वसई पूर्व भागातील वाघराळपाडा येथे डोंगराच्या मुळाशी असलेल्या चाळीवर दरड कोसळली. यावेळी ठाकूर कुटुंब हे गाढ झोपेत होते. त्यांना काही कळण्याच्या आतच दरडीखाली अख्खी चाळ दबली गेली. आणि चारजण ढिगार्‍याखाली अडकले.

यामध्ये अमित ठाकूर वय 35, रोशनी ठाकूर वय 14 या बाप आणि लेकीचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर या दुर्घटनेची माहिती समजताच मदत कार्यासाठी आलेल्या वसई- विरार महापालिकेच्या अग्निशमन दल व एनडीआरएफच्या जवानांना ढिगार्‍याखाली अडकलेल्या
दोघांना 9 वाजता बाहेर काढण्यात यश आले. यामध्ये वंदना अमित ठाकूर, वय 33 आणि ओम अमित ठाकूर वय 10 यांचा समावेश आहे. या दोघांना वाचवण्यात यश आले असले तरी दोघांच्याही हातापायांना गंभीर दुखापती झाल्या आहेत. त्यांच्यावर वसई येथील आयसीस व प्लॅटिनम या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

तसेच याच परिसरातील रहिवासी अपसाना शेख वय 45, लाजमीन शेख वय 22, वसीम शेख वय 35, सादिक शेख वय 19, नसीम शेख वय 30 व अन्य मिळून 10 जण जखमी झाले आहेत. वालीव भागातील या चाळी डोंगराच्या मुळाशी वसल्या आहेत. जवळजवळ 10 ते 12 चाळी आजही धोक्याच्या कक्षेत आहे. एकूण 20 ते 25 कुटुंबे या भागात राहत आहेत. यांच्या पुनर्वसनाची मागणी आता होत आहे. ही सर्व कुटुंबे उत्तरप्रदेश, राजस्थान येथून आल्याचे सांगण्यात येते

Back to top button