लखनौ : आपले शारीरिक आरोग्याकडे जितके लक्ष असते तितके मानसिक आरोग्याकडे असत नाही. सध्याच्या धकाधकीच्या, ताणतणावाच्या काळात अनेक लोक डिप्रेशन म्हणजेच नैराश्य किंवा औदासिन्यासारख्या मानसिक विकाराच्या गर्तेत अडकत आहेत. योग्य सल्ला व औषधोपचाराने ही समस्या पूर्णपणे बरी होत असते; पण मुळात आपल्याला काही मानसिक विकार जडला आहे, याकडेच अनेकांचे लक्ष असत नाही. आजाराचे वेळीच निदान होणेही गरजेचे असते, नाही तर समस्या अधिक गंभीर बनते. या पार्श्वभूमीवर आता एक असे उपकरण विकसित करण्यात आले आहे, ज्याच्या मदतीने डिप्रेशनचा सहजपणे छडा लावता येऊ शकतो. हे उपकरण आवाजातील वेदना ओळखून संबंधित माणूस डिप्रेशनमध्ये आहे की नाही हे अवघ्या 20 सेकंदांमध्ये सांगू शकते!
डिप्रेशनच्या विळख्यात अडकलेला माणूस आत्महत्येसारखे टोकाचे पाऊलही उचलू शकतो. त्यामुळे अशा काही मानसिक समस्यांकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे ठरते. मात्र, त्याच्या निदानासाठी आजपर्यंत कोणतेही मशिन किंवा डिव्हाईस नव्हते. आता पीजीआय लखनौमध्ये असे डिव्हाईस बनवण्यात आले आहे. ते मेंदूत सुरू असलेल्या चिंतेचे गांभिर्य आणि डिप्रेशनच्या स्तराचा छडा लावण्यात सक्षम आहे. पीजीआय स्थित मेडटेक सेंटर ऑफ एक्सीलंसने 'एआय'च्या साहाय्याने एक अॅप विकसित केले आहे. त्याचे नाव आहे 'मनोदयम'.
आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित हे अॅप वीस सेकदांमध्येच आवाज ऐकून व्यक्ती डिप्रेशनमध्ये आहे की नाही हे सांगू शकते. आयआयटी कानपूरच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागाचे विभागाचे प्रा. डॉ. तुषार संघन यांच्या निर्देशनाखाली आवाजाच्या नमुन्यांचे विश्लेषण करण्यात आले. त्यामध्ये डिप्रेशनचे 80 टक्के आणि चिंतेच्या 76 टक्के नमुन्यांना सत्यता मिळाली. मेडटेक सेंटर ऑफ एक्सीलेंस सीओईचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर श्याम कुमार यांनी सांगितले की, सेंटरमध्ये आजाराचे निदान आणि उपचारासाठी उपयुक्त उपकरणे बनवली जात आहेत. त्यामध्ये नैराश्य व चिंतेचा छडा लावणार्या या अॅपचा समावेश आहे. भविष्यात ते अतिशय उपयुक्त ठरू शकते.