गांधीजींच्या शासनमान्य चित्राला 71 वर्षेे पूर्ण | पुढारी

गांधीजींच्या शासनमान्य चित्राला 71 वर्षेे पूर्ण

सतीश डोंगरे

नाशिक : कोणतेही शासकीय कार्यालय किंवा शाळा-कॉलेजच्या कार्यालयांत गेले की राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे एक सुंदर चित्र आपल्याला दिसते. अर्थातच ते शासकीय मान्यता मिळालेले चित्र आहे. हे शासनमान्य चित्र साकारले आहे 71 वर्षांपूर्वी म्हणजेच 1952 मध्ये. ते साकारणारे चित्रकार होते नाशिकचे दिवाकरपंत शुक्ल.

ब्रिटिश राजवटीत सरकारी कार्यालये आणि शाळांमध्ये केवळ राणी एलिझाबेथ व राजा पंचम जॉर्ज यांचे छायाचित्र लावले जात असे. मग स्वतंत्र भारतात महात्मा गांधीजींना ते स्थान का मिळू नये, असा विचार स्वतंत्र भारत निर्मात्यांच्या मनात चमकून गेला. 71 वर्षांपूर्वी म्हणजेच 1952 मध्ये घडलेली ही घटना आजही नाशिककर मोठ्या अभिमानाने जागवतात. दिवाकरपंत शुक्ल यांचे नातू श्याम शुक्ल यांनी त्यांचा जीवनप्रवास उलगडला. दिवाकरपंत मूळचे अकोला जिल्ह्यातील रिसोडचे. शालेय जीवनापासून त्यांची आकर्षक, उत्तमोत्तम चित्रे काढण्याची हातोटी होती. वर्गात ते शिक्षकांचे कॅरिकेचर्स काढण्यात पारंगत होते. मात्र, त्यांच्या या स्वभावाला खोडकर अशी उपमा देत शिक्षक त्यांना नेहमीच बाकावर उभे करीत.

मात्र काही शिक्षकांना त्यांच्यातील या कलेचा आदरही होता. त्यामुळे त्यांना आर्ट स्कूलमध्ये प्रवेश घेण्याचा सल्ला देण्यात आला. त्या काळात आर्ट स्कूल म्हटले की, बडोद्याशिवाय पर्याय नव्हता. बडोद्याला जाण्यासाठी पुरेसे पैसे नसल्याने त्यांनी इंदूर येथे असलेल्या भावाकडे धाव घेतली. तिथे ते इंदूरकर महाराजांचे खास चित्रकार रामचंद्रराव प्रतापराव यांच्या स्टुडिओबाहेर तासन्तास उभे राहून काढलेले चित्र न्याहाळत असत. शेवटी एकदा रामचंद्ररावांनीच त्यांना विचारले, ‘काय हवंय बाळ तुला?’ ‘काही नाही, मला चित्रकलेचा छंद आहे.’ ‘पण बाबा रे, चित्रकलेचा राजाश्रय नसेल तर चित्रकार व्यर्थ आहे. बडोद्याला जातोस का? मी देतो तुला शिफारसपत्र?’ तेव्हा दिवाकरपंतांनी इंदूरचा निरोप घेतला. विनातिकीट प्रवास करीत त्यांनी बडोदा गाठले. तेथील कलाभवनचे प्राचार्य होरा यांनी कलाभवनामध्ये ‘फ्री स्टुडंटस्’ म्हणून प्रवेश दिला. तिथे सयाजीराजे, इंदूमती राणीसाहेब यांचे पोट्रेट काढण्याचे काम मिळाले.

1932 ते 39 या काळात लंडन आणि दर्बनच्या जागतिक प्रदर्शनात त्यांच्या कलाकृतींना मानाचे स्थान मिळाले. 1948 मध्ये त्यांच्या व्हिजन या कलाकृतीला लंडनच्या आंतरराष्ट्रीय कला प्रदर्शनात बहुमान मिळाला. ‘फोटोग्राफ्स ऑफ द वर्ल्ड’मध्ये त्यांचे ‘व्हिजन’ प्रसिद्ध झाले. लंडनच्या रॉयल फोटोग्राफिक सोसायटीने त्यांना ऑनररी असोसिएटचा सन्मान दिला.

स्वतंत्र भारतात महात्मा गांधीजींच्या प्रतिमेला शासकीय कार्यालयांमध्ये स्थान का मिळू नये? असा विचार त्यांच्या मनात आला. त्यांनी महात्मा गांधी यांच्या स्मरणार्थ काढलेल्या टपाल तिकिटावरील चित्राचीच सुधारित सुंदर प्रतिकृती रेखाटून सरकारला सादर केली. सरकारने तातडीने हे चित्र देशातील सर्व शासकीय कार्यालयांत लावण्यात यावे, असे आदेश काढले. गांधीजींच्या चित्राचे त्यांना एवढे वेड होते की, महात्माजींच्या जीवनातील अनेक कलाकृती त्यांनी रेखाटल्या. त्यांच्या चळवळीतील विविध प्रतीकात्मक रूपे त्यांनी साकारली. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पोट्रेट चित्रामुळे शुक्ल यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली.

पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांची संकल्पना

पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या संकल्पनेतून महात्मा गांधी यांच्यावरील टपाल तिकिटाची प्रत माहितीसाठी देशातील नामवंत चित्रकारांना पाठवली होती. त्यात नाशिकच्या दिवाकरपंत शुक्ल यांचाही समावेश होता. ते पाहून शुक्ल यांनी या तिकिटावरील चित्राचीच सुधारित प्रतिकृती (पोट्रेट) तयार केली आणि ती राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांना पाठवली. ते चित्र त्यांना खूपच भावले. भारत सरकारलाही त्यांनी ते सादर केले. विशेष म्हणजे त्या प्रतिकृतीला शासन मान्यता मिळाली अन् देशातील सर्व शासकीय कार्यालये, शाळांमधील भिंतींवर या चित्राची प्रतिकृती लावण्याचे आदेश निघाले. सरकारने पुढे शुक्ल यांना तब्बल 15 हजार प्रतींची ऑर्डरही दिली. आज सर्वच शासकीय कार्यालयांत गांधीजींचे हे चित्र पाहायला मिळते.

Back to top button