25 उद्योगपतींना 16 लाख कोटींची कर्जमाफी; शेतकर्‍यांवर मात्र अन्याय | पुढारी

25 उद्योगपतींना 16 लाख कोटींची कर्जमाफी; शेतकर्‍यांवर मात्र अन्याय

धुळे : पुढारी वृत्तसेवा ; या देशात उद्योगपतींचे कर्ज माफ होते; पण शेतकरी, शेतमजूर, महिला आणि युवा उद्योजकांना कर्जमाफी दिली जात नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 ते 25 उद्योगपतींना 16 लाख कोटी रुपयांची कर्जमाफी दिली, असा आरोप काँग्रेसचे नेते तथा खासदार राहुल गांधी यांनी केला. यावेळी झालेल्या महिला न्याय मेळाव्यात त्यांनी महिला विकासाची पंचसूत्रीही जाहीर केली. काँग्रेसचे सरकार आल्यास महिलांना पंचसूत्रीच्या माध्यमातून न्याय दिला जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

संबंधित बातम्या 

काँग्रेसच्या माध्यमातून काढण्यात आलेल्या भारत जोडो न्याय यात्रेचे बुधवारी (दि. 13) धुळ्यात आगमन झाले. यावेळी राहुल गांधी बोलत होते.

सभेला काँग्रेसचे अखिल भारतीय सचिव जयराम रमेश, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे, आमदार कुणाल पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्ष अलका लांबा, खासदार चंद्रकांत हांडोरे, तसेच रजनी पाटील आदी उपस्थित होते.

भारतामधील 90 टक्के लोकांवर दररोज वेगवेगळ्या मार्गाने अन्याय होतो. भारतात 22 लोकांकडे पैसा आहे. देशातील 70 कोट्यी नागरिकांकडे असलेला पैसा या 22 लोकांकडे आहे, तरीही सरकार 16 लाख कोटींची कर्जमाफी देऊन अरबपतींना संधी देते. विकासासाठी शेतकर्‍यांची जमीन घेतली जाते. मात्र, लाभाची भागीदारी देण्यासाठी शेतकर्‍याला उभे केले जात नाही, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. काँग्रेसचे सरकार येताच देशात जातनिहाय जनगणना केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

‘कैसे है आप दाजीसाहब’; सोनियांशीही मोबाईलवरून संपर्क

भारत जोडो न्याय यात्रेनिमित्त खासदार राहुल गांधी हे धुळ्यामध्ये दाखल होताच त्यांनी पहिली भेट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री रोहिदास पाटील यांची देवपूर-धुळे येथील निवासस्थानी जाऊन घेतली. यावेळी त्यांनी ‘कैसे है आप दाजीसाहब!’ असे विचारत आलिंगन दिले. यावेळी खासदार गांधी यांनी रोहिदास पाटील यांच्या प्रकृतीची व वैद्यकीय उपचारांची माहिती घेतली. रोहिदास पाटील यांच्या पत्नी लताताई यांचा सोनिया गांधी यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क साधून दिला. सोनिया गांधी यांनी तब्येतीची विचारपूस केली.

Back to top button