Nashik News | १९ कोटी खर्चून उभारणार ‘उद्योग भवन ०.२’, कार्याध्येश पारित | पुढारी

Nashik News | १९ कोटी खर्चून उभारणार 'उद्योग भवन ०.२', कार्याध्येश पारित

नाशिक : सतीश डोंगरे

उद्योगांसाठी आवश्यक असलेली कार्यालये एकाच छताखाली असावीत, या उद्देशाने सातपूर, आयटीआय सिग्नल येथे उभारलेल्या ‘उद्योग भवन’लगत जिल्हा उद्योग केंद्राच्या जागेवर ‘उद्योग भवन ०.२’ उभारले जाणार आहेत. यासाठी १८ कोटी ७० लाख ४९ हजार ९६५ रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, याबाबतचे कार्याध्येशही देण्यात आले आहेत. २०२५ पर्यंत या जागेवर तीनमजली इमारत उभी राहणार आहे.

माजी दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या संकल्पनेतून १९९९ मध्ये नाशिकमध्ये उद्योग भवन उभारले गेले. याठिकाणी एमआयडीसीच्या प्रादेशिक कार्यालयासह, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ, कामगार उपायुक्तालय, अन्न, औषध प्रशासन तसेच उद्योगांशी निगडित इतरही कार्यालये आहेत. याला लागूनच जिल्हा उद्योग केंद्राचे (डीआयसी) कार्यालय असून, या कार्यालयाची इमारत १ मे १९७८ मध्ये उभारली गेली आहे. तब्बल ४६ वर्षे जुनी असलेली ही इमारत आता जमीनदोस्त होणार आहे. या इमारतीच्या भूखंडावर तीनमजली प्रति उद्योग भवन उभारले जाणार आहे. याबाबतची निविदा गेल्या १२ फेब्रुवारी रोजीच काढण्यात आली असून, एका खासगी विकासकाला ११ मार्च २०२४ रोजी कार्याध्येशदेखील देण्यात आले आहे. जिल्हा उद्योग केंद्राच्या प्लॉट नंबर १५ वर तब्बल ३१५२.३२ स्क्वेअर मीटर इतके बांधकाम उभारले जाणार आहे. पुढील १५ दिवसांत प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात होणार असून, ११ सप्टेंबर २०२५ पर्यंत बांधकाम पूर्ण करण्याचे आदेश विकासास देण्यात आले आहेत. दरम्यान, नव्या इमारतीमुळे जिल्हा उद्योग केंद्राची ऐतिहासिक इमारत मात्र जमीनदोस्त होणार आहे.

अशी असेल इमारत

जिल्हा उद्योग केंद्रासाठी उभारण्यात येणाऱ्या उद्योग भवन ०.२ ची इमारत तीनमजली असणार आहे. तळमजल्यावर जिल्हा सांख्यिकी कार्यालय तसेच कॅन्टीन व कॉन्फरन्स हॉल असणार आहे. पहिल्या मजल्यावर जिल्हा उद्योग केंद्राचे सहसंचालक यांचे कार्यालय तसेच मिटिंग हॉल असणार आहे. दुसऱ्या मजल्यावर जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापकांचे कार्यालय तसेच अतिथी कक्ष असणार आहे. तर तिसऱ्या मजल्यावर कार्यालयांच्या प्रस्तावित गरजांसाठी दोन प्रशस्त हॉल उभारण्यात येणार आहेत.

‘डीआयसी’ जॉर्ज फर्नांडिस यांची संकल्पना

१९७७ मध्ये मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली जनता सरकारमध्ये उद्योगमंत्री असलेल्या जॉर्ज फर्नांडिस यांनी जिल्हा उद्योग केंद्राची संकल्पना मांडली. १९७७ च्या औद्योगिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर देशातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा उद्योग केंद्र स्थापन करण्याचे त्यावेळी निश्चित केले गेले. त्यानुसार १ मे १९७८ मध्ये देशभरात जिल्हा उद्योग केंद्रे उभारण्यात आली. ‘एल आणि एच’ या दोनच आकारांमध्ये जिल्हा उद्योग केंद्राच्या इमारती देशभर उभारण्यात आल्या. नाशिकमध्ये १ मे १९७८ मध्ये ‘एच’, तर जळगावात एल आकाराची इमारत उभारली गेली. लघुउद्योग व कुटिरोद्योगाचा विकास ग्रामीण भागात करण्याचा मुख्य हेतू यामागचा होता.

जिल्हा उद्योग केंद्राचे स्थलांतर

नव्या इमारतीच्या बांधकामामुळे जिल्हा उद्योग केंद्राचे लवकरच स्थलांतर केले जाणार आहे. जिल्हा उद्योग केंद्राचे सहसंचालक यांचे कार्यालय आयटीआय सिग्नल येथील उद्योग भवन येथे स्थलांतरित केले जाणार असून, महाव्यवस्थापकांचे कार्यालय कॅनडा कॉर्नर येथील बीएसएनएल भवन येथे स्थलांतरित करण्याबाबतचे नियोजन सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

हेही वाचा-

Back to top button