Nashik News | आजपासून शाळा गजबजणार, शिक्षकांसाठी हे नवीन नियम लागू | पुढारी

Nashik News | आजपासून शाळा गजबजणार, शिक्षकांसाठी हे नवीन नियम लागू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- महापालिकेच्या शाळा शनिवार (दि.१५)पासून सुरू होत आहेत. या शाळांमधील शिक्षकांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करताना ड्रेसकोडही लागू करण्यात आला आहे. जीन्स, टी शर्ट परिधान करून शाळेत येण्यास बंदी घालण्यात आली आहे. यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना शिक्षणाधिकारी बी. टी. पाटील यांनी जारी केल्या आहेत.

२०२४-२५ या शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या शिक्षकांची नुकतीच कार्यशाळा पार पडली. त्यात शिक्षणाधिकारी पाटील यांनी शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांना महत्त्वपूर्ण सूचना केल्या. खासगी शाळांच्या स्पर्धेत महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा निभाव लागावा यासाठी ज्ञानदानाचे कार्य परिश्रमपूर्वक करण्याचे तसेच विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी यासाठी पूरक उपक्रम राबविण्याच्या सूचना पाटील यांनी दिल्या आहेत. महापालिकेच्या शाळांमध्ये गोरगरीब विद्यार्थी शिक्षण घेतात. शाळाबाह्य मुला-मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याची जबाबदारी शिक्षकांनी उचलावी, असे आवाहन करताना विद्यार्थ्यांची उपस्थिती १०० टक्के राहावी यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे पाटील यांनी सांगितले.

शाळांमध्ये शिक्षकांच्या हजेरीसाठी यंदा प्रथमच सेल्फी व थम पद्धती अवलंबिली जाणार आहे. त्याचबरोबर शिक्षकांना ड्रेसकोड सुद्धा लागू करण्यात आला आहे. शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद ड्रेसकोड शिक्षकांनी अवलंबवावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

शिक्षकांसाठी असा असेल ड्रेसकोड…

  • हलक्या रंगाचे शर्ट व गडद रंगाची फुल पॅन्ट ट्राउझर, पायात बूट.
  • महिलांसाठी साडी, सलवार कमीज, दुपट्टा, चप्पल किंवा आवश्यकतेनुसार बूट.
  • शर्टवर कुठल्याही प्रकारचे चित्र विचित्र नक्षीकाम किंवा चित्र नसावे.
  • स्काउट गाइडच्या शिक्षकांना स्काउट गाइडचा गणवेश बंधनकारक.

विद्यार्थ्यांचे आज स्वागत

महापालिका शाळांची शनिवारी (दि.१५) पहिली घंटा वाजणार आहे. हा दिवस विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय ठरावा म्हणून शिक्षण विभागातर्फे नियोजन केले जात असून, विद्यार्थ्यांचे स्वागत फुले देऊन केले जाणार आहे. प्रभातफेरी काढली जाईल. शालेय पोषण आहारअंतर्गत विद्यार्थ्यांना मिष्टान्न दिले जाणार आहे. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप होईल. नवीन प्रवेशासाठी शाळापातळीवर प्रयत्न करण्यात येणार आहेत. शाळा व परिसर आकर्षक फुलांनी सजविले जाणार आहेत.

शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शिक्षकांसाठी ड्रेसकोड निश्चित केला आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत केले जाणार असून, प्रभातफेरी काढण्यात येईल. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटपही केले जाईल.- बी. टी. पाटील, शिक्षणाधिकारी, महापालिका

हेही वाचा –

Back to top button