काळीज पिळवटून टाकणारी घटना ! सिन्नर तालुक्यातील चिमुकल्या बहिण-भावाचा तलावात बुडून मृत्यू | पुढारी

काळीज पिळवटून टाकणारी घटना ! सिन्नर तालुक्यातील चिमुकल्या बहिण-भावाचा तलावात बुडून मृत्यू

सिन्नर(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- सिन्नर तालुक्यातील रामनगर येथे रवींद्र त्रंबक भंडकर या शेतकऱ्याची धनश्री रविंद्र भंडकर(४), आविष रवींद्र भंडकर (५) ही दोन मुले घरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पाच ते सहा फूट खोल छोट्याशा तलावात पडल्याने त्यांचा दुर्दैवी अंत झाला.

रामनगर या छोट्याशा गावातील ग्रामस्थ एका लग्नानिमित्त बाहेरगावी गेलेले होते. मोजकेच लोक आणि दुर्दैव अंत झालेल्या लहानग्यांची आई घरीच होती. ही मुलं खेळता खेळता केव्हा पाण्यात पडली हे कोणाच्याही लक्षात आले नाही.

लग्न समारंभावरून जेव्हा लोक गावात आले तेव्हा त्या पाण्याच्या छोट्याशा तलावाजवळ लहान मुलांचा आरडाओरड काय चाललाय म्हणुन बघितले असता दोन चिमुकली मुले पाण्यावर तरंगत असलेली आढळून आली. यानंतर गावातीलच भाऊराव मंडले आणि सोमनाथ मंडले यांनी त्यांना पाण्याच्या बाहेर काढले.

लागलीच ग्रामस्थांनी जवळीलच मनेगाव येथील खाजगी दवाखान्यात त्यांना हलवले असता डॉक्टरांनी तपासणी करत त्यांना मृत घोषित केले. पोलीस पाटील सविता गोफणे यांनी सिन्नर पोलीस स्टेशनला घटनेची माहिती दिली. सिन्नर पोलीस स्टेशनचे राठोड, तांबडे व यादव यांनी घटनास्थळाला भेट देत पाहणी केली. त्या बालकांचे मृतदेह सिन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात उच्चस्तरीय तपासणीसाठी पाठवले.

हेही वाचा –

Back to top button