Lok Sabha Election 2024 : अंतिम आकडेवारीत मतदान 6 % वाढले; राजकीय पक्षांकडून काळेबेरे झाल्याची भीती | पुढारी

Lok Sabha Election 2024 : अंतिम आकडेवारीत मतदान 6 % वाढले; राजकीय पक्षांकडून काळेबेरे झाल्याची भीती

मुंबई ः पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यासाठीची मतदानाची आकडेवारी जाहीर करताना केलेला विलंब आणि मतदानाच्या दिवशी जाहीर झालेल्या आकडेवारीत व अंतिम आकडेवारीतील मोठ्या फरकामुळे निवडणूक आयोगावर टीकेचा भडिमार होऊ लागला आहे. राजकीय पक्ष व जाणकारांनी यावरून आयोगाला धारेवर धरले आहे. देशात दोन टप्प्यांत झालेल्या मतदानाच्या अंतिम आकडेवारीत एकूण 6 टक्क्यांनी, तर राज्यात दोन टप्प्यांत 13 मतदारसंघांत झालेल्या मतदानाच्या टक्केवारीत 3.08 टक्के वाढ झाल्याने निकालात काही काळेबेरे तर होणार नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
राज्यात मतदानातील सर्वाधिक 7 टक्के वाढ चंद्रपूर लोकसभेत, यवतमाळ-वाशिम मतदारसंघात 5.87 टक्के वाढ झाल्याने या मतदारसंघांसह राज्यातील सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

पहिल्या टप्प्यातील मतदान 19, तर दुसर्‍या टप्प्यातील मतदान 26 एप्रिलला झाले. मात्र निवडणूक आयोगाने मतदानाची अंतिम टक्केवारी पहिल्या टप्प्याच्या 11 दिवसांनी, तर दुसर्‍या टप्प्यानंतर 4 दिवसांनी 30 एप्रिलला भारतीय निवडणूक आयोगाने जाहीर केली.मात्र या आकडेवारीवर आक्षेप घेण्यात येत असून आयोगावर टीकाही होतेय.

मतदानाच्या पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यात जवळपास 66 टक्के मतदान झाले, असे निवडणूक आयोगाने 30 एप्रिलला जाहीर केले. पण मतदानाच्या दिवशी जाहीर करण्यात आलेल्या प्राथमिक आकडेवारीपेक्षा हे प्रमाण तब्बल 6 टक्के जास्त आहे. 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 19 एप्रिलला 102 जागांसाठी मतदान झाले संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सुमारे 60 टक्के मतदान झाल्याचे त्या दिवशी निवडणूक आयोगाने जाहीर केले होते. 26 एप्रिलला 13 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांतल्या 88 जागांसाठीचा मतदानाचा दुसरा टप्पा पार पडला. या दिवशी 61टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले होते.

पहिल्या टप्प्यातल्या मतदानाला 10 दिवस उलटून गेले आणि दुसर्‍या टप्प्यातल्या मतदानाला 3 दिवस झाले तरी इथली मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर केली नाही, म्हणून काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि तृणमूल काँग्रेसने दोन दिवसांपूर्वी निवडणूक आयोगावर टीका केली होती.

आयोगावरील प्रमुख आक्षेप

निवडणूक आयोगाने मतदानाची आकडेवारी न देता टक्केवारी दिली आहे. प्रत्येक मतदारसंघात किती नोंदणीकृत मतदार आहेत आणि त्यापैकी कितीजणांनी मतदान केले, याची आकडेवारी निवडणूक आयोगाने दिलेली नाही. 2019 आणि 2014 च्या निवडणुकीच्या मतदानानंतर निवडणूक आयोगाने अशी आकडेवारी दिली होती.

निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर लोकसभा मतदारसंघातील एकूण नोंदणीकृत मतदारांची आकडेवारीच उपलब्ध नाही. एवढेच नव्हे तर प्रत्येक टप्प्यात मतदारसंघ निहाय किती मतदारांनी मतदान केले, याची आकडेवारीही आयोगाच्या संकेतस्थळ व व्होटर टर्नआऊट या त्यांच्या अ‍ॅपवर उपलब्ध नाही. अनेक राज्यांतील मतदारांची आकडेवारी शोधायचा प्रयत्न केल्यास आयोगाच्या संकेतस्थळावर एरर हा संदेश दिसू लागतो.

राज्यात 13 मतदारसंघांत 3 टक्क्यांनी मतटक्का वाढला. चंद्रपुरात मतदानाची टक्केवारी 7 टक्क्यांनी वाढली
नागपुरात मात्र किंचित घटली.

Back to top button