जिल्हाधिकार्‍यांकडून ‘त्या’ दोन पबला दणका; सात दिवसांत उत्तर द्या, अन्यथा कारवाई

जिल्हाधिकार्‍यांकडून ‘त्या’ दोन पबला दणका; सात दिवसांत उत्तर द्या, अन्यथा कारवाई

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मद्यधुंद अवस्थेत आलिनाश पोर्शे गाडी बेफाम वेगात चालवून दोघांचा जीव घेणारा अल्पवयीन मुलगा आणि त्याच्या मित्रांना मद्यविक्री केल्याबाबतचा प्रकार निदर्शनास आल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी मुंढवा येथील कोझी आणि मेरियट सूटमधील हॉटेल ब्लॅक यांना दणका दिला आहे. या दोन्ही हॉटेलला (पब) कारणे दाखवा नोटीस काढत, सात दिवसांत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. त्याबरोबरच सात दिवसांत उत्तर न दिल्यास एकतर्फी कारवाई करण्याचेही आदेशात नमूद केले आहे.

आयटी अभियंता तरुण-तरुणीच्या अपघाती मृत्यूचा प्रकार समोर आल्यानंतर, राज्य उत्पादन शुल्क विभागाने (एक्साईज) अल्पयवीन मुलगा पार्टीसाठी ज्या पबमध्ये गेला होता, तेथील पाहणी केली. त्या वेळी सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो आणि त्याचे मित्र पार्टीत मद्य प्राशन करताना दिसून आले आहेत. तसेच, त्यांना मद्यविक्री केल्याचे तेथील बिलावरून आणि त्यांनी दिलेल्या पैशांवरून पुढे आले आहे. याबाबतचा अहवाल राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्हाधिकार्‍यांकडे सादर केला होता.

काय आहे एक्साईजच्या अहवालात ?

  • दोन्ही पबच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये अल्पवयीन मुलगा आणि त्याच्या मित्रांना मद्यविक्री, त्याचबरोबर ते मद्य प्राशन करताना आढळून आले
  • कोझी पबमध्ये दोन दिवस मद्यविक्रीच्या नोंदी नाहीत.
  • विनामद्य सेवन परवाना ग्राहकांना मद्यविक्री नोकरनामे सादर नाहीत
  • ब्लॅक येथेदेखील मद्यविक्रीच्या नोंदी आढळून आल्या नाहीत. त्यांना रजिस्टरबाबत विचारले असता, त्यांनी उपलब्ध नसल्याचे सांगितले.

अशी आहे एक्साईजची नियमावली

रेस्टॉरंट बारमध्ये ग्राहकांना मद्यविक्री करण्यापासून ते मद्य पिणार्‍यांसाठी एक्साईजची काय नियमावली आहे, याबाबत एक्साईजचे निरीक्षक वसंत कौसडीकर काय सांगतात ते पाहा एका दृष्टिक्षेपात…

मुंबई दारूबंदी अधिनियमातील अशा आहेत तरतुदी

  • मुंबई दारूबंदी अधिनियम 1949 नुसार एक्साईजचे कामकाज चालते.
  • वयाची 25 वर्षे पूर्ण केलेल्या व्यक्तीलाच मद्य प्राशन करण्याचा परवाना मिळतो.
  • एक महिना, एक वर्ष आणि कायमस्वरूपी असे तीन प्रकारे परवाने दिले जातात.
  • एक्साईजकडून परवाना देताना मंजूर करण्यात आलेल्या जागेतच मद्यविक्री करणे बंधनकारक आहे.
  • मद्य प्राशन करण्याचा परवाना असलेल्या व्यक्तीनेच मद्याची ऑर्डर द्यावी.
  • ऑर्डर घेणार्‍याने परवाना पाहून मद्यविक्रीचे बिल फाडावे.
  • विशेष म्हणजे परवाना क्रमांकावरच त्याचे बिल फाडलेले असावे.
  • अल्पवयीन मुलांना मद्यविक्री करण्यास निर्धारित नियमानुसार बंदी आहे.
  • वयाचा पुरावा पाहूनच रेस्टॉरंट बारमध्ये प्रवेश दिला जावा.
  • परवाना कक्षातील कामगारांचे नोकरनामे दाखले बंधनकारक
  • दैनंदिन मद्यविक्रीच्या नोंदी रेस्टॉरंट, बारचालकांना ठेवणे गरजेचे आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news