‘असा खासदार मान्य आहे का?’ मालेगावी सुभाष भामरेंच्या उमेदवारीविरोधात बॅनर | पुढारी

'असा खासदार मान्य आहे का?' मालेगावी सुभाष भामरेंच्या उमेदवारीविरोधात बॅनर

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा- धुळे-मालेगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपचे विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. परंतु डॉ. भामरे यांच्या उमेदवारीला विरोधदेखील होत असून, त्याचाच प्रत्यय मालेगावात शुक्रवारी (दि. 22) आला. शहरातील मोसमपूल मध्यवर्ती ठिकाणी डॉ. भामरे यांच्या उमेदवारीला विरोध करणारा बॅनर लागल्याने शहरात चर्चांना उधाण आले आहे. ‘असा खासदार मान्य आहे का?’ असा प्रश्‍न उपस्थित करीत उमेदवारीला विरोध करण्यात आला आहे.

धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपकडून उमेदवारी मिळण्यास इच्छुकांची मोठी गर्दी झाली होती. मात्र अखेरच्या क्षणी भाजपने डॉ. भामरे यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी दिल्याने इच्छुकांचा चांगलाच हिरमोड झाला, तर दुसरीकडे भाजपांतर्गत डॉ. भामरे यांना विरोध करणार्‍या गटामध्येदेखील याविषयी नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. डॉ. भामरे यांच्या उमेदवारीने भाजपमधील नाराजी नाट्याची चर्चा थांबत नाही, तोच शहरात शुक्रवारी खा. भामरे यांच्या उमेदवारीला विरोध करणारे फलक लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ‘असा खासदार मान्य आहे का?’ असा प्रश्‍न उपस्थित करणार हा फलक चर्चेचा विषय ठरला. यावर कुणाचेही नाव नसल्याने फलक कुणी लावला? हा प्रश्‍न मात्र अनुत्तरित आहे.

या फलकामुळे डॉ. भामरे यांच्याविषयी असलेल्या नाराजीचा सूर उघड झाला आहे. दरम्यान, महापालिका प्रशासनाने हा फलक हटवला असून, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.

Back to top button