Jalgaon News | चाळीसगाव गोळीबार प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल | पुढारी

Jalgaon News | चाळीसगाव गोळीबार प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
चाळीसगाव येथील माजी नगरसेवक महेंद्र उर्फ बाळा मोरे यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. याप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्लेखोरांचा शोध पोलीस घेत आहे. पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज लागलेला असून यामध्ये आरोपी कसे आले व कसे पसार झाले हे दिसून येत आहे. आरोपींच्या शोधासाठी पाच पथके रवाना करण्यात आली असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे.

चाळीसगाव येथील भाजपाचे माजी नगरसेवक महेंद्र उर्फ बाळू मोरे हे सिंधी कॉलनी येथील जनसंपर्क कार्यालयात बुधवार दि.7 रोजी बसलेले होते. यावेळी एक सफेद रंगाचे चारचाकी वाहन त्यांच्या कार्यालयाजवळ येऊन थांबले. त्यामधून प्रथम तीन जण व नंतर दोन जण अशी एकूण पाच जण तोंडावर रुमाल बांधलेले बाहेर आले. गावठी कट्टा हाती घेत त्यापैकी तीन जण पुढे आले. त्यापैकी दोन जणांनी माजी नगरसेवक बाळू मोरे यांच्यावर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. गोळीबार झाल्यानंतर पाचही जण  वाहनामध्ये बसून नारायणवाडी पेट्रोल पंपाच्या दिशेने फरार झाले. हा घटनाक्रम नजीकच्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला आहे. पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्यासह त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

जखमी झालेले बाळू मोरे यांना तातडीने चाळीसगाव वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे नेण्यात आले. त्यांच्यावर फायरिंग करण्याचे कारण काय याचा मात्र अद्यापपर्यंत उलघडा झालेला नाही. याप्रकरणी संजय बैसाने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उद्देश उर्फ गुड्डू शिंदे, सॅम चव्हाण दोन्ही (रा. हिरापूर) सचिन गायकवाड, अनिस शेख उर्फ नवा शरीफ शेख, भूपेश सोनवणे, सुमित भोसले चारही (रा. चाळीसगाव) आणि संतोष निकुंभ उर्फ संता पैलवान (रा. हिरापूर,चाळीसगाव) यांच्या विरुद्ध पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी देखील घटनास्थळी भेट दिली. त्यांच्यासोबत अप्पर पोलीस अधीक्षिका कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरूडे आदी पोलीस अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड करीत आहेत.

हेही वाचा:

Back to top button