भोसरीतील पाण्याच्या टाकीची सुरक्षा वार्‍यावर : महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष | पुढारी

भोसरीतील पाण्याच्या टाकीची सुरक्षा वार्‍यावर : महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

भोसरी : पुढारी वृत्तसेवा : संत तुकारामनगर येथील परिसरास पाणीपुरवठा करणार्‍या पाण्याची टाकी जुनी झाली असून, टाकीची सिमेंट जीर्ण झाल्याने आतील लोखंडी गज दृष्टीस पडत आहेत. त्यामुळे टाकीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. परिणामी नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली आहे. पालिका प्रशासनाने नागरिकांचे हित व सुरक्षा लक्षात घेता त्वरित उपायोजना करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. संत तुकारामनगर येथे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने परिसरास पाणीपुरवठा करण्यासाठी पाण्याची टाकी सुमारे वीस वर्षांपूर्वी उभारण्यात आलेली आहे. सध्या या टाकीची दुरवस्था झाली आहे. या टाकीतूनच सध्या पाणीपुरवठा केला जातो. टाकीच्या जिन्याचीही दुरवस्था झाली आहे. जिन्याच्या पायर्‍या तुटल्या आहेत. टाकीला तडे गेले असून, त्यामुळे धोका निर्माण झाला आहे.

  •  पाण्याची टाकी परिसरात नागरिकांची मोठी वर्दळ असते. लहान मुले याठिकाणी खेळत असतात. तर काही नागरिक टाकीखाली बसलेले दिसून येतात. टाकीच्या शेजारी पालिकेचे आरोग्य कार्यालय तसेच संत तुकाराम महाराजांचे मंदिर आहे.
  •  भाविक तसेच आरोग्य विभागात येणारे नागरिक टाकी खाली विसावा घेत असतात. त्याचबरोबर पाणीपुरवठा विभागातील कामगारही याठिकाणी नियमितपणे ये- जा करत असतात.
  •  या टाकीचे सिमेंट जीर्ण झाल्याने त्याचे तुकडे नागरिकांच्या अंगावर पडत आहेत; तसेच सिमेंट निघाल्याने टाकीचे लोखंडी गज दिसून येत आहेत. परिणामी नागरिकांची तसेच कर्मचार्‍यांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे.
  •  एखादा मोठा अपघात होण्याआधीच याठिकाणी सुरक्षा उपायोजना करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

संत तुकारामनगर येथील पाण्याची टाकी नागरिकांसाठी धोकादायक ठरू शकते. टाकीचे सिमेंट निघाल्याने टाकीचे गज दिसून येत आहेत. प्रशासनाने टाकी परिसरात संरक्षक जाळी बसविणे गरजेचे आहे.

– प्रवीण लोंढे, स्थानिक

टाकी परिसरात नागरिकांनी जाणे टाळावे. या ठिकाणी सुरक्षाजाळी लवकरच बसविण्यात येईल; गुळवेवस्ती येथे नवीन पाण्याची टाकी बांधण्यात आली असून, येथील वाहिनीची पाईप लाइन जोडण्याचे काम सुरु आहे.

– रामनाथ टकले, कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा इ क्षेत्रीय कार्यालय

हेही वाचा

Back to top button