जळगाव : ब्रह्ममुहूर्तापासून रामनामाचा जल्लोष, मंदिरांमध्ये घंटानाद व आरती | पुढारी

जळगाव : ब्रह्ममुहूर्तापासून रामनामाचा जल्लोष, मंदिरांमध्ये घंटानाद व आरती

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

संपूर्ण भारतभर रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. खानदेशामध्येही ब्रह्ममुहूर्तापासून रामाच्या स्थापनेसाठी मंदिरांमध्ये उत्सव साजरा करण्यात येत आहे.

शहरात विविध ठिकाणी जागोजागी नाश्ता भोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहेत तर संपूर्ण परिसर भगवामय झालेला पहावयास मिळत आहे. रस्ते गल्लोगल्ल्या मंदिरे आकर्षक फुलांनी व विद्युत रोषणाईने सजवण्यात आलेले आहेत. आरत्या, रामनाम जपत भजन, मंगलवाद्य, शंखनाद करण्यात येत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामधील मुख्य रस्ते हे भगव्या ध्वजांनी सजलेले असून गल्लीबोळांमध्ये पताका लावण्यात आलेल्या आहेत. जागोजागी भक्तांसाठी विविध पदार्थांचे स्टॉल लावले असून काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात भंडारा आयोजित करण्यात आला आहे. तर काही ठिकाणी होमहवन करण्यात येत आहे. व्यापा-यांकडून मार्केट बंद ठेवून रामलल्ला प्रतिष्ठेस्थापनेनिमित्त महाप्रसाद ठेवण्यात आला आहे. तर जिल्ह्यातील काही ठिकाणी थेटप्रक्षेपणाचे आयोजन करण्यात आलेले आहे. संपूर्ण जिल्हा हा रामभक्ती मध्ये रममान झालेला पहावयास मिळत आहे.

प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यात एकूण मिरवणुका ८२ – त्यामध्ये शोभायात्रा -14, पालखी – सहा, दिंडी – 26, कलशयात्रा – 3, मूर्ती प्रतीमा पूजन – 3, मोटरसायकल रॅली – 5 व इतर धार्मिक कार्यक्रम व महाआरती – 39, भजन व कीर्तनाचा कार्यक्रम – 19, महाप्रसादाचे आयोजन – 31 ठिकाणी ठेवण्यात आले आहे. तर लाईव्ह प्रक्षेपण – 7 ठिकाणांवरून दाखवण्यात येत आहे. संगीत रामायण – 2 तर दोन ठिकाणावरून प्रभातफेरी काढण्यात आली आहे. संपूर्ण जिल्ह्यात स्थानिक पोस्ट स्तरावर बंदोबस्त लावण्यात आलेला असून अतिरिक्त पोलीस कुमक जळगाव येथून 4 आरसीपी प्लाटून स्ट्रायकिंग फोर्स 100 पोलीस हवालदार व पाच अधिकारी सहाशे पुरुष होमगार्ड व 150 महिला होमगार्ड असा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.

हेही वाचा:

Back to top button