पुढारी ऑनलाईन डेस्क : Team India T20 WC : आयसीसी टी-20 विश्वचषकासाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली निवड समितीने कोणतीही जोखीम न घेता अनुभवी खेळाडूंवर विश्वास व्यक्त केला आहे. मात्र, असे असतानाही संघात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या चिंताजनक आहेत. अमेरिका आणि वेस्ट इंडिजच्या भूमीवर खेळल्या जाणाऱ्या या जागतिक स्पर्धेतील आव्हानांवर मात करणे रोहित शर्मासाठी सोपे नसेल. यासोबतच काही खेळाडूंच्या निवडीवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. केएल राहुलचा स्ट्राईक रेट ऋषभ पंतपेक्षा चांगला असूनही त्याचा संघात समावेश न होणे संशयास्पद आहे. अशा परिस्थितीत, वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची ताकद आणि कमकुवतता काय आहेत ते जाणून घेऊया.
रोहित शर्माने स्वतःला कर्णधार म्हणून सिद्ध केले आहे. त्यामुळे तो सर्वात आधी संघाची ताकद आहे. सलामीला त्याची बॅट चालली, तर गोलंदाजांची काही खैर नसेल. आतापर्यंत हिटमॅनच्या नेतृत्वाखाली एकही विश्वचषक जिंकता आलेला नाही, पण यंदा विश्वचषक विजेतेपदाचा दुष्काळ संपुष्टात येईल अशी सर्व भारतीय चाहत्यांना विश्वास आहे. भारतीय संघाची दुसरी ताकद म्हणजे जसप्रीत बुमराह, जो भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज मानला जातो. त्याचबरोबर कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांच्या निवडीमुळे फिरकी विभागही मजबूत दिसत आहे. सूर्यकुमार यादवच्या रूपाने संघाकडे असा आक्रमक फलंदाज आहे, ज्याने विरोधी संघाच्या गोलंदाजांना धडकी भरली आहे. तर विराट कोहली जबरदस्त फॉर्मात आहे. आयपीएलच्या या मोसमात विराटने 500 हून अधिक धावा केल्या आहेत. हे सर्व खेळाडू टी-20 विश्वचषकात टीम इंडियासाठी सर्वात मोठी ताकद ठरणार आहेत.
भारतीय संघाला आश्वासक अष्टपैलू खेळाडूची उणीव भासत आहे. आपल्या खेळीने सामन्याला कलाटणी देऊ शकतील अशा मॅच फिनिशर खेळाडूची कमतरता आहे. संघातील एकमेव वेगवान गोलंदाज अष्टपैलू हार्दिक पंड्याला उपकर्णधार बनवण्यात आले आहे, परंतु त्याची निवड सध्याच्या फॉर्मच्या आधारावर नाही तर मागील कामगिरीच्या आधारावर करण्यात आली आहे. मधल्या फळीत झटपट धावा काढण्यास सक्षम खेळाडूंचा अभाव आहे. शिवम दुबेकडे पंड्याला रिप्लेस करण्याची क्षमता आहे पण हे दोन्ही खेळाडू प्लेइंग इलेव्हनमध्ये एकत्र सहभागी होतील, असे वाटत नाही. दुसरीकडे रवींद्र जडेजाही फारशी स्फोटक फलंदाजी करण्यास समर्थ नाही.
बुमराहविरुद्ध धावा करणे सोपे नाही, पण त्याच्याशिवाय डेथ ओव्हर्समध्ये धावांचा प्रवाह रोखू शकणारा दुसरा गोलंदाज संघात नाही. मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग यांनी शेवटच्या षटकांमध्ये खूप धावा दिल्याचे आपण यापूर्वी पाहिले आहे, जे भारतीय संघासाठी चिंतेचे कारण बनू शकते. त्यामुळेच संघाला दुखापतग्रस्त मोहम्मद शमीची उणीव भासणार आहे.
रोहित शर्माने आयपीएल 2024 मध्ये धडाकेबाज शतक झळकावले आहे, परंतु असे असूनही तो धावा काढण्यासाठी संघर्ष करताना दिसत आहे. संघात शेवटपर्यंत फलंदाजी करणाऱ्या खेळाडूंची कमतरता आहे. टॉप ऑर्डरमधील फलंदाज लवकर बाद झाले तर मधल्या आणि तळातील फलंदाजांवर दबाव वाढेल. (Team India T20 WC)
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
राखीव खेळाडू : शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद, आवेश खान.