

पुणे : पुढारी वृत्तसेवा : खडकीतील मुळा नदीपात्रातील खुनाचा खडकी पोलिसांनी चोवीस तासांत छडा लावून एकाला ताब्यात घेतले आहे. खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने संबंधित व्यक्तीचा मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न आरोपींनी केला होता.
विजय राजू धोतरे (वय 33, रा. धानोरी, विश्रांतवाडी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो वाहनचालक म्हणून काम करत होता. याप्रकरणी, पोलिस कर्मचारी शशांक सुरेश डोंगरे यांनी खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात व्यक्तींच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता. ही घटना 17 मार्च रोजी उघडकीस आली होती.
खुनाला अनैतिक संबंध आणि दारू पिताना झालेल्या किरकोळ वादाचे कारण असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.नवी खडकी परिसरातील मुळा नदीपात्रात जलपर्णी आहे. नदीपात्रात एकाचा मृतदेह पडला असून, मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाची ओळख न पटण्यासाठी जाळण्यात आला आहे. अर्धवट अवस्थेत जळालेला मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त विजयकुमार मगर यांनी घटनास्थळी भेट दिली.
दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करत असताना, तांत्रिक विश्लेषण आणि घटनास्थळाच्या पुराव्यावरून पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटविली. त्यानंतर एका आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्या इतर साथीदारांचा पोलिस शोध घेत आहेत. विजय धोतरे याचा येथील नवीन होळकर पुलाखाली डोक्यात दगडाने मारून आणि चाकूने गळा कापून खून केला, त्यानंतर अर्धवट जळालेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह खडकीतील मुळा नदीच्या पात्रात टाकून देण्यात आला होता, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिघावकर यांनी दिली.
हेही वाचा