नाशिक विभागात टंचाईच्या झळा, ९६ मंडळे दुष्काळी | पुढारी

नाशिक विभागात टंचाईच्या झळा, ९६ मंडळे दुष्काळी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- गतवर्षी अत्यल्प पर्जन्यमान राहिल्याने नाशिक विभागावर पाणीटंचाईचे संकट घोंगावते आहे. पावसाअभावी विभागातील सहा तालुके व ९६ महसूल मंडळांमध्ये शासनाने दुष्काळ घोषित केला आहे. महसूल प्रशासनातर्फे या सर्व ठिकाणी टँकरने पाणीपुरवठ्यासह विविध उपाययोजनांवर भर दिला जात आहे. सद्यस्थितीत नंदुरबार वगळता उर्वरित चार जिल्ह्यांत दोन लाख ६३ हजार ६१९ ग्रामस्थांना १४८ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

२०२३ म‌ध्ये अल निनोच्या प्रभावामुळे नाशिक विभागाकडे पावसाने पाठ फिरवली. पुरेशा पर्जन्यमानाअभावी बहुतांश जिल्ह्यांमध्ये मर्यादित जलसाठा शिल्लक आहे. बहुतांश तालुक्यांमध्ये नैसर्गिक जलस्त्रोत आटले आहेत. परिणामी जानेवारीच्या प्रारंभीच दुष्काळाने डोके वर काढले आहे. शासनाने विभागातील पाच तालुक्यांचा गंभीर दुष्काळाच्या यादीत समावेश केला असून, एक तालुका मध्यम दुष्काळाच्या छायेत आहे. याशिवाय ३८ तालुक्यांतील ९६ महसुली मंडळांमध्येही दुष्काळ घोषित केला आहे. त्यामध्ये नाशिकचे १३, धुळ्यातील २५, जळगावच्या २४ तसेच नगरमधील सर्वाधिक ३४ मंडळांचा समावेश आहे. या सर्व ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या मार्गदर्शन तत्त्वानुसार विविध उपाययोजना लागू केल्या आहेत.

दुष्काळ घोषित केलेले तालुके तसेच महसुली मंडळांमध्ये टँकरने पाणीपुरवठ्यासह पीककर्जाचे पुनर्गठन, शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कमाफीसह निरनिराळ्या उपाययाेजनांवर भर दिला जात आहे. दरम्यान, येत्या काळात उन्हाच्या वाढत्या कडाक्यासोबत टंचाईचा दाह अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी प्रशासनाला येत्या काळात अधिक सतर्क राहावे लागणार आहे.

दुष्काळी भागासाठी सवलती

– आवश्यक तेथे टँकरने पाणीपुरवठा

– जमीन महसुलात सूट

– पीककर्जाचे पुनर्गठन

– शेतीकर्जाच्या वसुलीस स्थगिती

– कृषिपंपाच्या चालू वीजबिलात ३३.५ टक्के सूट

– विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ

– राेहयोअंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता

– टंचाई घोषित गावात शेतीच्या पंपाची वीजजोडणी खंडित न करणे

टॅंकरची सद्यस्थिती

**जिल्हा गावे/वाड्या टँकर लोकसंख्या**
नाशिक 390 119 1,60,610
धुळे 20 1 40,455
जळगाव 15 16 36,881
नगर 70 12 25,745

एकूण | 495 | 148 | 2,63,691

तीव्र दुष्काळी तालुके

मालेगाव, सिन्नर, येवला, चाळीसगाव व नंदुरबार, शिंदखेडा (मध्यम दुष्काळी)

हेही वाचा :

Back to top button