उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘पुढारी’च्या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन | पुढारी

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘पुढारी’च्या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : गेल्या दहा वर्षांत महाराष्ट्राचा विविध क्षेत्रांत झपाट्याने विकास झाला असून, त्याबद्दलचा वेध घेणारे कॉफी टेबल बुक दै. ‘पुढारी’ वृत्त समूहाने प्रसिद्ध केले असून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कॉफी टेबल बुकचे गुरुवारी ‘मेघदूत’ या शासकीय निवासस्थानी प्रकाशन झाले.

‘पुढारी’ समूहाचे चेअरमन आणि समूह संपादक डॉ. योगेश प्रतापसिंह जाधव, नॅशनल मार्केटिंग हेड आनंद दत्ता यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा आणि राज्याच्या वर्तमान प्रगतीचा संख्यात्मक दस्तावेज असलेल्या या कॉफी टेबल बुकचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी कौतुक केले.

महाराष्ट्राने गेल्या काही वर्षांत सर्व क्षेत्रांत केलेली प्रगती या कॉफी टेबल बुकच्या माध्यमातून अधोरेखित होते, असे सांगत फडणवीस यांनी ‘पुढारी’च्या या उपक्रमाला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. फडणवीस म्हणाले, अतिशय सुंदर कॉफी टेबल बुक ‘पुढारी’ने प्रकाशित केले आहे. महाराष्ट्राचा अगदी नेमका वेध या कॉफी टेबल बुकमध्ये घेतला आहे. सुंदर फोटोग्राफस् आहेत. सर्व प्रकारची सांख्यिकी आहे. महाराष्ट्र गेल्या काही वर्षांत कसा बदलत आहे, महाराष्ट्राने कशी प्रगती साधली आहे, हे सर्व यात बघायला मिळते. कृषी असेल, उद्योग-व्यापार असेल, पर्यटन क्षेत्र असेल, या सर्व क्षेत्रांत राज्याने काय केले आहे, हे या कॉफी टेबल बुकमध्ये पाहायला मिळते.

‘पुढारी’चे समूह संपादक डॉ. योगेश प्रतापसिंह जाधव यांनी या टेबल बुकबद्दल आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. ते म्हणाले, गेल्या दहा वर्षांत महाराष्ट्रात वेगाने विकास झाला आहे. सर्व क्षेत्रांत राज्य प्रगतिपथावर आहे; पण दररोजच्या धावपळीच्या जीवनात राज्य विकासात किती पुढे गेले आहे, याचे मोजमाप करण्यास सामान्य माणसाला वेळ नाही. त्यामुळे विकासाच्या या माहितीचा डेटा पुस्तक रूपात मांडण्याची माध्यमांची जबाबदारी आहे. ‘पुढारी’ने त्यासाठी पुढाकार घेतला. ‘पुढारी’च्या टीमने अत्यंत काळजीपूर्वक व शास्त्रीय पद्धतीने राज्याच्या विकासाचा हा डेटा इन्फ्रोग्राफिकली मांडला आहे. ज्यांना महाराष्ट्राची गेल्या दहा वर्षांतील प्रगतीची माहिती घेण्याची इच्छा असेल, त्यांच्यासाठी हे कॉफी टेबल बुक उपयुक्त ठरेल. तसेच या पुस्तकात अत्यंत सोप्या पद्धतीने देण्यात आलेली माहिती सगळ्यांना फायदेशीर ठरेल. गेल्या 10 वर्षांतील 8 वर्षांत महाराष्ट्राच्या विकासाचे शिल्पकार असलेले आणि विकासाची दूरद़ृष्टी असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन झाले, याचा मला विशेष आनंद आहे, असेही डॉ. योगेश जाधव म्हणाले.

Back to top button