चेन्नई : वृत्तसंस्था, दक्षिणेकडील समुद्राजवळ असलेल्या तामिळनाडूत हिल – स्टेशनलाही कधी कडाक्याची थंडी – नसते. तेथे सुखद गारवा असतो. वातावरणातील दमटपणा व इतर घटकांमुळे थेट हिमालयासारखी थंडी पडणे हा प्रकारच तामिळनाडूत अशक्य वाटणारा आहे; पण यंदा हाही चमत्कार घडला आहे. (Temperature)
उधगमंडलम या डोंगराळ – जिल्ह्यातील कंथल आणि थलाईकुंथा या दोन गावांत तापमान चक्क शून्याच्या जवळ गेले आहे. मागील काही दिवसांपासून येथे १ अंश तापमान बघायला मिळत आहे. हा सगळा नीलगिरीच्या जंगलांचा भाग असून, तेथे घनदाट जंगल व हिरवागार आसमंत असतो. यंदा मात्र १ अंशापर्यंत तापमान घसरल्याने हवामान तज्ज्ञ चिंतित झाले आहेत. शून्याच्या जवळ तापमान कधीच जात नाही. हा झालेला बदल जागतिक तापमानवाढीमुळे झालेल्या बदलांमुळेच असून, त्याचे आगामी काळात आणखी गंभीर परिणाम बघायला मिळू शकतात, अशी शंका तज्ज्ञांनी वर्तवली आहे.