Jitendra Awad : नाशिकमध्ये जितेंद्र आव्हाडांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला उलटे लटकवले | पुढारी

Jitendra Awad : नाशिकमध्ये जितेंद्र आव्हाडांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला उलटे लटकवले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; श्रीरामाविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ नाशिकमध्ये साधू-महंतांनी जितेंद्र आव्हाडांविरोधात (Jitendra Awad) गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्यापाठोपाठ शिवसेनेच्या शिंदे गटानेही मायको सर्कल येथील कार्यालयासमोर आव्हाडांच्या प्रतीकात्मक पुतळ्यास उलटे लटकवत जोडे मारो आंदोलन केले.

राष्ट्रवादी (शरद पवार गटा)चे नेते आव्हाड यांनी शिर्डी येथील शिबिरात श्रीराम मांसाहारी असल्याचे वादग्रस्त विधान केले. या विधानाच्या निषेधार्थ राज्यभरात तीव्र पडसाद उमटले आहेत. शिवसेना शिंदे गटाने आक्रमक होत आव्हाड यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला उलटे लटकवत जोडे मारो आंदोलन केले. नाशिकच्या तपोवनात रावणाची बहीण शूर्पणखाचे नाक कापले होते. या घटनेचे स्मरण करत आव्हाडांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे नाकही शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी कापले. याप्रसंगी सहसंपर्कप्रमुख चंद्रकांत लवटे, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे, लोकसभा संघटक योगेश म्हस्के, युवासेना विस्तारक योगेश बेलदार, उपजिल्हाप्रमुख श्यामकुमार साबळे, अमोल सूर्यवंशी, विधानसभाप्रमुख बाबूराव आढाव, रोशन शिंदे, रूपेश पालकर आदी उपस्थित होते.

अयोध्येत साकारत असलेल्या श्रीराम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा दि. २२ जानेवारी २०२४ रोजी होणार असून, यानिमित्त देशात सर्वत्र आनंदाचे, धार्मिक वातावरण असताना हे वातावरण दूषित करण्याचे काम जितेंद्र आव्हाड करत आहेत. उबाठा गटाचे जे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या मांडीला मांडी लावून बसतात, रोज सकाळी मीडियाला प्रवचने देतात, ते याबाबत काही बोलणार आहेत की नाही, याची आम्ही वाट पाहतो आहोत. – अजय बोरस्ते, जिल्हाप्रमुख, शिवसेना (शिंदे गट)

हेही वाचा :

Back to top button