Pune : नारायणगाव येथे 100 खाटांचे सुसज्ज रुग्णालय | पुढारी

Pune : नारायणगाव येथे 100 खाटांचे सुसज्ज रुग्णालय

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा :  नारायणगाव येथील पुणे- नाशिक महामार्गालगत सन 1991 मध्ये कार्यान्वित झालेल्या ग्रामीण रुग्णालयाची श्रेणी वाढ करून 100 खाटांचे सर्व सुविधायुक्त रुग्णालयाची उभारणी करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. रुग्णालयाच्या उभारणीसाठी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी तब्बल 105 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. लवकरच या कामाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार अतुल बेनके यांनी दिली.

नारायणगाव येथे असलेल्या मध्यवर्ती चार एकर क्षेत्रात सुमारे 30 वर्षांपूर्वी ग्रामीण रुग्णालयाची उभारणी करण्यात आली. रुग्णालयाच्या आवारातच डॉक्टर व कर्मचार्‍यांसाठी निवास व्यवस्था करण्यात आली होती. सध्या येथे असलेल्या रुग्णालयाची इमारत पाडून तेथे सुसज्ज इमारत बांधली जाणार आहे. आरोग्य सेवेचे बळकटीकरण करण्यासाठी हे रुग्णालय तालुक्यातील जनतेला जीवनदायी ठरणार आहे.
येथे सद्य:स्थितीत रुग्णालयात 30 खाटा आहेत; मात्र सुविधा व तज्ज्ञ डॉक्टरांअभावी रुग्णालयात शस्त्रक्रिया होत नाहीत. पुणे- नाशिक महामार्गावर अपघाताची संख्या वाढली आहे.

यामुळे रुग्णांना उपचारासाठी खासगी हॉस्पिटल किंवा पुणे येथील रुग्णालयात जावे लागत आहे. यामुळे रुग्णांना मोठा आर्थिक भुर्दंड बसत आहे. दरम्यान आमदार बेनके यांच्या माध्यमातून कोरोना काळात या ठिकाणी ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आला आहे. रुग्णालयाची इमारत, डॉक्टर व कर्मचार्‍यांची निवासस्थाने जीर्ण झाली आहेत. आमदार बेनके यांच्या प्रयत्नामुळे सध्याच्या ग्रामीण रुग्णालयाची श्रेणी वाढ करून 100 खाटांचे सर्व सुविधायुक्त रुग्णालय उभारण्यास राज्य शासनाने खास बाब म्हणून परवानगी दिली आहे.

रुग्णालयात उपलब्ध होणार्‍या सुविधा
अतिदक्षता विभाग
अपघातग्रस्तांसाठी तातडीच्या शस्त्रक्रिया
सुसज्ज ऑपरेशन थिएटर
कृत्रिम श्वासाची सुविधा
एक्स-रे, सिटीस्कॅन, सोनोग्राफी आणि डायलिसिस सुविधा
अद्ययावत पॅथॉलॉजी लॅब
सुसज्ज प्रसूती विभाग
नेत्र, दंत, नाक, घसा, बालरोगतज्ज्ञ विभाग
स्त्रीरोगतज्ज्ञ विभाग
मानसोपचारतज्ज्ञ
61 तज्ज्ञ डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी
अद्ययावत रुग्णवाहिका
साथीचे रोग उपचार सुविधा
रक्तपेढी

Back to top button