साक्रीत मुलींसाठी मासिकपाळी व्यवस्थापन समुपदेशन कार्यशाळा | पुढारी

साक्रीत मुलींसाठी मासिकपाळी व्यवस्थापन समुपदेशन कार्यशाळा

पिंपळनेर (जि.धुळे): पुढारी वृत्तसेवा- साक्री येथील जिजामाता कन्या विद्यालय आणि आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी पुणे आणि त्रिशरण एनलाइटमेंट फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून किशोरवयीन मुलींसाठी आरोग्य आणि आत्मसन्मान साठी मासिकपाळी दरम्यान स्वच्छता आणि आरोग्य याबाबत एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला.

समुपदेशन आणि प्रशिक्षणात संस्थेच्या स्वयंसेविका रेखा महाले यांनी संस्थेची माहिती आणि संस्थेने आतापर्यंत महिला संबलीकरणात केलेले कार्य याची माहिती दिली. तसेच, किशोरवयीन मुलींसाठी मासिकपाळी दरम्यान आरोग्याची काळजी कशी घ्यावी, आपले शरीराला कोणत्या आहाराची गरज असते आणि मासिकपाळी दरम्यान असलेली उदासीनता, अनास्था आणि नकारात्मक मानसिकता यामुळे मुलींमध्ये मानसिक विकार तयार होऊ शकतात या विषयी समुपदेशन आणि मार्गदर्शन केले.

प्रशिक्षणदरम्यान मुलींना संस्थेकडून आरोग्य विषयी माहिती पुस्तीका आणि सॅनिटरी किकलीची माहिती पुस्तीका देण्यात आली. या पुस्तिकांमध्ये मासिकपाळीच्या नैसर्गिक चक्रासंबंधीची माहिती दिलेली आहे. तसेच, शारीरिक बदल, मानसिक बदल, भावनिक बदल इत्यादींची माहिती दिलेली आहे. मासिकपाळी दरम्यान स्वच्छता आणि आरोग्य या बाबी कशा राखाव्यात हे समजण्यासाठी ही सॅनिटरी किकली आणि फोल्डर संस्थेकडून दिलेले उपयुक्त ठरेल.

यावेळी शाळेतील शिक्षिका के.आर. अहिरे यांनी देखील मुलींना शाळेत येतांना घ्यावयाची काळजी आणि आरोग्याबाबत उपयुक्त अशी माहिती दिली.

प्रशिक्षण यशस्वीतेसाठी त्रिशरण एनलाइटनमेंट फाउंडेशन पुणेच्या व्यवस्थापकीय संचालक प्रज्ञा वाघमारे आणि प्रशांत वाघमारे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच, जिजामाता कन्या विद्यालयातील मुख्याध्यापक विजया पवार, एन.के. सोनवणे, आदर्श माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.एन. पाटिल, श्रीमती के.आर. अहिरे आणि के.आर. अहिरराव यांनी सहकार्य केले. या प्रशिक्षणामुळे किशोरवयीन मुलींमध्ये मासिकपाळीबद्दलची माहिती आणि जागरूकता वाढून त्यांना आरोग्य आणि आत्मसन्मान यांचे रक्षण करता येईल अशी अपेक्षा आहे.

हेही वाचा :

Back to top button