एलन मस्क यांच्या Tesla चा भारतातील पहिला प्लांट गुजरातमध्ये, लवकरच अधिकृत घोषणा

एलन मस्क यांच्या Tesla चा भारतातील पहिला प्लांट गुजरातमध्ये, लवकरच अधिकृत घोषणा

पुढारी ऑनलाईन : एलन मस्क यांची जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी टेस्ला (Tesla) लवकरच भारतात एंट्री करणार आहे. टेस्ला कंपनी भारतातील त्यांचा पहिला प्लांट गुजरातमध्ये उभारण्याच्या तयारीत आहे. टेस्लाच्या गांधीनगर येथे उभारण्यात येणाऱ्या प्लांटबाबतची घोषणा व्हायब्रंट गुजरात समिट २०२४ च्या दरम्यान केली जाण्याची शक्यता असल्याचे वृत्त आहे.

संबंधित बातम्या 

गुजरातचे आरोग्य मंत्री आणि राज्य सरकारचे प्रवक्ते ऋषिकेश पटेल यांनी नुकतेच म्हटले, "त्यांचे सरकार खूप आशावादी आहे की एलन मस्क यांच्या नेतृत्वाखालील टेस्ला एक प्लांट उभारण्यासाठी गुजरातची निवड करेल आणि या संदर्भात कंपनीशी चर्चा सुरू आहे.

अमेरिकेतील इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी टेस्ला गुजरातमध्ये त्यांचा निर्मिती प्रकल्प उभारण्याचा विचार करत असल्याच्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर पटेल यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

"टेस्लाने गुजरातमध्ये यावे याबद्दल राज्य सरकारला खूप आशा आहे. एलन मस्क यांचीदेखील गुजरात ही पहिली पसंती म्हणून पाहत आहेत. जेव्हापासून त्यांनी भारतात प्रकल्प उभारण्यासाठी योग्य जागा शोधण्यासाठी सर्वेक्षण सुरू केले तेव्हापासून गुजरातचा विचार त्यांच्या मनात आहे," असे पटेल म्हणाले.

"टेस्ला गुजरातमध्ये येईल. या संदर्भात लवकरच अधिकृत घोषणा केली जाईल. आम्ही निश्चितपणे त्यांचे स्वागत करू आणि सर्व आवश्यक सहकार्य देऊ, जसे आम्ही यापूर्वी टाटा, फोर्ड आणि सुझुकीला दिले होते." असे पटेल यांनी गांधीनगरमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले.

जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक कार निर्मात कंपनी टेस्ला इंकचे प्रमुख एलन मस्क यांनी जूनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची न्यूयॉर्कमध्ये भेट घेतली होती. मस्क यांनी पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर २०२४ मध्ये भारताला भेट देण्याची त्यांची योजना असल्याचे सांगितले होते.

सप्टेंबरमध्ये गुजरातचे अतिरिक्त मुख्य सचिव (उद्योग आणि खाण विभाग) एस जे हैदर म्हणाले होते की, केंद्र सरकार भारतात उत्पादन सुविधा उभारण्यासाठी टेस्लाच्या संपर्कात आहे.

टेस्ला इंडिया मोटर अँड एनर्जी लिमिटेडने याआधी पुण्यात त्यांच्या कार्यालयासाठी जागा पाच वर्षांसाठी ११.६५ लाखांच्या सुरुवातीच्या मासिक भाड्याने घेतली आहे. Tesla चे हे भारतातील पहिले कार्यालय आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news