Nashik E-Shivai Bus : नाशिक विभागात धावणार १६७ नवीन ई-शिवाई | पुढारी

Nashik E-Shivai Bus : नाशिक विभागात धावणार १६७ नवीन ई-शिवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाच्या ताफ्यात लवकरच नव्याने १६७ ‘ई-शिवाई’ (E-Shivai Bus) दाखल होणार आहेत. महामंडळाच्या विविध मार्गांवर या बसेस धावणार आहेत. त्यामुळे नाशिककरांचा प्रवास जलद व सुखकर होण्यासोबत प्रदूषणाला आळा बसणार आहे.

‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ अशी बिरुदावली असलेल्या एसटी महामंडळाने काळानुरूप बदलाची परंपरा कायम ठेवली आहे. हे बदल स्वीकारताना महामंडळाने अधिक प्रवासाभिमुख भूमिका स्वीकारली आहे. प्रवाशांना अधिक चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एसटी महामंडळाने त्यांच्या ताफ्यामध्ये ई- शिवाई बसेस दाखल केल्या आहेत. संपूर्णत: इलेक्ट्रिक असलेल्या या बसेसची अंतर्गत सजावट उत्कृष्ट असल्याने अल्पावधीत त्या प्रवाशांच्या पसंतीस उतरल्या आहेत. (Nashik E-Shivai Bus)

एसटी महामंडळाच्या नाशिक विभागामध्ये सध्या नऊ ई-शिवाई बसेस आहेत. यासर्व बसेस नाशिक-पुणे मार्गावर चालविण्यात येत आहेत. प्रवाशांचा त्याला चांगला प्रतिसाद लाभतो आहे. महामंडळाने आता नाशिक विभागासाठी १६७ नवीन ई-शिवाई देण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काळात टप्प्या- टप्प्याने या बसेस नाशिकमध्ये दाखल होतील, अशी माहिती महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली. बसेस पुण्यासह मुंबई, औरंगाबाद, धुळे व अन्य मार्गांवर सोडण्याची तयारी एसटी महामंडळाने केल्याचे समजते. ई-शिवाई बसेसमुळे नाशिकमधून परजिल्ह्यात जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर व आनंददायी होणार आहे.

चार्जिंग स्टेशनची उभारणी

महामंडळाच्या नाशिक विभागामधून पुण्यासाठी दिवसभरात नऊ ई-शिवाई धावतात. पुणे विभागाच्या शिवाईदेखील प्रवासी घेऊन नाशिकमध्ये येतात. या बसेसच्या बॅटरी चार्जिंगसाठी महामंडळाच्या एन. डी. पटेल रोड येथील कार्यशाळेत एक स्टेशन उभारले आहे. तेथे एकावेळी दोन बसेस चार्जिंग होतात. याशिवाय याच कार्यशाळेत नव्याने दोन तसेच मालेगाव आणि सटाणा येथे प्रत्येकी एक चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

ई-शिवाईची वैशिष्ट्ये (Nashik E-Shivai Bus)

– प्रदूषणमुक्त प्रवास आणि इंधनावरील खर्च कमी

– एसटी महामंडळाची विजेवर धावणारी पहिली वातानुकूलन बस

– या बसचा रस्त्यावर धावताना आवाजही येत नाही

– बसमध्ये अपंगांसाठी स्वतंत्र रॅम्प; बस जीपीएसयुक्त

– आपत्कालीन सूचना देण्यासाठी बटणांची सुविधा

– सुरक्षेसाठी बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा व अन्य सुविधा

– पहिला ई-शिवाई १ जून २०२३ ला नगर-पुणे मार्गावर धावली

-एसटी महामंडळ पाच हजार ई-शिवाई ताफ्यात दाखल करणार.

हेही वाचा :

Back to top button