World Alzheimer’s Day : घरच्यांची परीक्षा बघणारा ‘अल्झायमर’ काय आहे ‘हा’ आजार? | पुढारी

World Alzheimer's Day : घरच्यांची परीक्षा बघणारा 'अल्झायमर' काय आहे 'हा' आजार?

नाशिक : दीपिका वाघ

वय झाले म्हणून विसरायला होणे, सतत चिडचिडपणा, दैनंदिन काम करायला अडचणी, रस्ता चुकणे, सकाळी काय खाल्ले ते विसरणे, भास, संशय, उदासीनता, एकच गोष्ट अनेकवेळा सांगणे ही वय वाढल्याची लक्षणे नसून अल्झायमर आजाराची लक्षणे मानली जातात. हल्ली जीवनमान उंचावल्याने आयुर्मान वाढत चालले आहे म्हणून समाजात वयोवृद्धांचे प्रमाण वाढले आहे. अल्झायमर हा वयोवृद्धांमध्ये आढळून येणारा एक आजार आहे, जो वयाच्या साठीनंतर आढळून येतो. त्याचे वेळीच निदान न झाल्यास झपाट्याने वाढत जाणारा हा आजार घरच्यांची परीक्षा बघणारा असतो. (World Alzheimer’s Day)

संबधित बातम्या :

अल्झायमरमध्ये डिमेन्शिया कॉमन प्रकार आहे. डिमेन्शिया हा मूलभूत मेंदूचा आजार आहे. ज्यामुळे मेंदूची कार्यक्षमता हळूहळू कमी होत जाते. डिमेन्शिया असणाऱ्या रुग्णांच्या मेंदूमध्ये ठराविक रचना आढळून येते. कारणांनुसार त्याचे वेगवेगळे प्रकार ठरतात. अल्झायमर डिमेन्शिया, बी १२ जीवनसत्त्वाच्या अभावामुळे आणि रक्तदाब, मधुमेहामुळे किंवा काही कारणास्तव मेंदूला रक्तपुरवठा कमी झाल्याने व्हॅस्क्युलर डिमेन्शिया जो रक्ताशी संबंधित आहे तो आजार होतो. (World Alzheimer’s Day )

मानसोपचार तज्ज्ञ डॉ. हेमंत सोननीस सांगतात की, अल्झायमर हा वयाच्या साठीनंतर आढळून येणारा आजार आहे. वेळीच आजाराचे निदान झाले नाही तर आजारपण झपाट्याने वाढत जाते. दीर्घकाळ आजारपण असल्याने आजाराचे निदान त्वरित झाले तर वृद्धांचे परावलंबित्व कमी होते. उपचार खर्चिक नसतात; केवळ सेवा, शुश्रूषा, प्रेम आणि पूर्णवेळ केअरटेकरची गरज मात्र पडू शकते.

घरच्यांचा संयम बघणारा आजार..(World Alzheimer’s Day)

अल्झायमर झालेला रुग्ण नॉर्मल दिसतो परंतु आजाराबाबत फारशी जनजागृती नसल्याने घरच्यांचा आजार लक्षात येत नाही. वय वाढले म्हणून ज्येष्ठ त्रास देतात, असा गैरसमज बाळगला जातो. या वयात घरच्यांना मदत करायची सोडून उलट घरच्यांना त्रास सहन करावा लागताे. यामुळे घरात वादविवाद होताना दिसतात. त्यासाठी समाजात केअरटेकरचे एज्युकेशन महत्त्वाचे ठरते. अल्झायमर हा दीर्घकाळ सुरू राहणारा आजार असल्याने मेंदूची कार्यक्षमता हळूहळू कमी होऊन घरच्यांवर परावलंबित्व वाढते. अल्झायमरमुळे केअरटेकर शारीरिक, मानसिक, आर्थिकदृष्ट्या थकून जातात. त्यासाठी नातेवाइकांनी जबाबदारी शेअर केली पाहिजे जेणेकरून केअरटेकरचे बर्डन कमी होईल.

अल्झायमर टाळण्यासाठी

साठीनंतर निवृत्ती झाली म्हणून आता कोणतेही काम करायचे नाही हा गैरसमज काढून टाकावा. मेंदूला जेवढे कमी काम तेवढी अल्झायमर होण्याची शक्यता वाढते. निवृत्तीनंतर स्वत:ला सतत अॅक्टिव्ह ठेवणे सर्वांत जास्त गरजेचे असते. रोजच्या दैनंदिन कामात नेहमी व्यस्त राहणे, मेंदूला चालना मिळेल असे काम करत रहावे, शब्दकोडे साेडवणे, वाचन या माध्यमातून मेंदू अॅक्टिव्ह ठेवावा यामुळे अल्झायमर दूर राहतो. आई वडिलांपासून मूल बाहेरगावी राहतात त्यासाठी वृद्धांनी सपोर्ट नेटवर्क तयार करणे गरजेचे असते. मित्रपरिवार, ग्रुप तयार करून एकमेकांना अडचणीच्या काळात मदत करता येते.

हेही वाचा :

Back to top button