Corona Vaccine : नपुंसकतेपासून जनुकीय बदलापर्यंत कोरोना लसीचे दुष्परिणाम? | पुढारी

Corona Vaccine : नपुंसकतेपासून जनुकीय बदलापर्यंत कोरोना लसीचे दुष्परिणाम?

कोल्हापूर : सुनील कदम

काल भेटलेला कुणी तरी धडधाकट तरुण आज अचानक निवर्तल्याचे समजत आहे, वयाच्या विशी-पंचविशीतच लोकांमध्ये हृदयविकार आणि मधुमेह बळावताना दिसत आहेत, कुणा कुणाला त्यांच्या सात पिढ्यांमध्येही आढळून न आलेले आनुवंशिक आजार जडताना दिसत आहेत, तर कुणी चक्क नपुंसकत्व आल्याचा दावा करीत आहे. हे बहुसंख्य प्रकार कोरोना लसीकरणानंतरच मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. जे कोरोनाबाधित नव्हते; पण प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लस घेतली त्यांच्यामध्ये भयंकर दोष निर्माण झाल्याचे आणि यापैकी काहींचा मृत्यूही झाल्याचे निष्पन्न झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे लोकांच्या मनात कोरोना लसींच्या भयावह दुष्परिणामांबद्दल उलट-सुलट चर्चा सुरू आहे. (Corona Vaccine)

 

डिसेंबर 2019 मध्ये चीनमधील वुहान शहरातील एका प्रयोगशाळेत कोरोनाचा प्रथम उद्रेक झाला आणि मार्च 2020 पर्यंत कोरोनाचा जगभर फैलाव झाला. भारतात याची सुरुवात 30 जानेवारी 2020 रोजी केरळमधून झाली. त्यानंतर जगभरातच कोरोनाच्या लसींबाबत युद्धपातळीवर संशोधन सुरू झाले. 24 जानेवारी 2020 रोजी चीनने ‘कॅनसिनो’ नावाची लस शोधून काढल्याचा दावा केला आणि लष्करासाठी त्याचा आपत्कालीन वापरही सुरू केला. त्यानंतर 11 ऑगस्टला रशियाने ‘स्पुटनिक’ आणि अमेरिकेने 20 नोव्हेंबरला ‘फायझर’ नावाची लस शोधून काढल्याचा दावा केला. हळूहळू ‘कोव्हिशिल्ड’, ‘कोव्हॅक्सिन’, ‘मॉडर्ना’ अशा 19 कोरोना प्रतिबंधक लसींचा शोध लागत गेला आणि तत्कालीन आरोग्य आणीबाणी विचारात घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने या लसींच्या आपत्कालीन वापराला परवानगी दिली; पण कोणतीही लस ही परिपूर्ण किंवा अंतिम असल्याचा दावा संशोधक कंपन्यांनी आणि जागतिक आरोग्य संघटनेनेही केलेला नव्हता. त्यामुळे कोरोनाचा हळूहळू प्रभाव कमी होताच जागतिक आरोग्य संघटनेने 5 मे 2023 पासून कोरोना लसींच्या आपत्कालीन वापरावर निर्बंध घातलेले असून, या लसींबाबत सध्या नव्याने संशोधन आणि चाचण्या सुरू आहेत. कोरोना लसींचा आपत्कालीन वापर सुरू झाल्यानंतर भारतासह जगभरातूनच वेगवेगळ्या तक्रारींचा ओघ सुरू झाला होता. लस घेतल्यानंतर छातीत दुखणे, अंगावर पुरळ उठणे, ताप येणे, कणकण येणे, उलट्या होणे, अशक्तपणा येणे, सांधेदुखी, डोकेदुखी, सर्दी-पडसे, खोकला अशा स्वरूपाच्या या तक्रारी होत्या. त्या त्यावेळी जागतिक आरोग्य संघटनेसह संबंधित लस तयार करणार्‍या कंपन्यांनी आणि आरोग्य क्षेत्रातील स्थानिक तज्ज्ञांनीही याबाबत खुलासे केलेले आहेत. लस घेतल्यानंतर उद्भवणारे किरकोळ आजार हे लसींच्या प्रभावाचे लक्षण असून, त्यात विशेष काही नाही, असे संबंधितांनी स्पष्ट केलेले होते. मात्र, त्यावेळीही सर्वच लोकांचे समाधान झालेले नव्हते आणि लसींच्या परिणामकारकतेपेक्षा त्यांच्या दुष्परिणामांबद्दलच लोकांमध्ये चर्चा होताना दिसत होती.

सध्या जागतिक आरोग्य संघटनेच्या आदेशानुसार, कोरोनाचे लसीकरण बंद झालेले आहे; पण अलीकडच्या काही दिवसांमध्ये वाढलेले हृदयरोगाचे, मधुमेहाचे आणि प्रामुख्याने तडकाफडकी मृत्यू होण्याचे प्रमाण, यामुळे लोकांमध्ये पुन्हा एकदा ‘हा कोरोना लसींचाच दुष्परिणाम’ असल्याची चर्चा सुरू झालेली दिसत आहे. योग्य ते सखोल संशोधन न करता अत्यंत घाईगडबडीने बाजारात आणलेल्या कोरोना लसींचाच हा प्रताप असल्याची भावना लोकांमध्ये बळावताना दिसत आहे. त्यामुळे याबाबतीत संबंधित जबाबदार आरोग्य संस्थांनी व आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनीच लोकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे; अन्यथा भविष्यात अशीच एखादी साथ उद्भवल्यास लोक लसीकरण करून घ्यायलाच तयार होणार नाहीत, अशी चिन्हे दिसू लागली आहेत.

डोसनंतर घडलेल्या घटनांची उदाहरणे अशी

  • कोल्हापूर शहरातील एका मध्यमवयीन व्यक्तीला कोरोनाची कधीही लागण झालेली नव्हती; पण खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी लसीचे तिन्ही डोस घेतले होते. पूर्वीपासून त्यांची प्रकृती अगदी ठणठणीत होती; पण लसीकरणानंतर साधारणत: सहा महिन्यांच्या आतच अचानक त्यांचे हृदयविकाराने निधन झाले आणि अनेकांना धक्का बसला.
  • लसीकरणानंतर सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यातील अवघ्या 35 वर्षांच्या तरुणामध्ये उच्च पातळीचा मधुमेह उद्भवला आहे. विशेष म्हणजे, त्याच्या पूर्वीच्या कोणत्याही पिढीत हा आजार नव्हता. लसीकरणानंतर मधुमेह उद्भवल्याची अशी उदाहरणे बरीच आढळून येत आहेत.
  • पूर्वी कधीही फारसे आजारी न पडणारे अनेक लोकही आजकाल किरकोळ कारणानेही आजारी पडताना दिसत आहेत. कोरोना लसीकरणानंतरच आपली रोगप्रतिकारकशक्ती कमी झाल्याची या लोकांची भावना आहे, तशीच अनेकांचीही आहे.

Corona Vaccine : कोरोनामुळे रुग्णांच्या चेतासंस्थेवर परिणाम

सुमारे 80 टक्के रुग्णांना अनेक विकार आता त्रास देत आहेत. अनेकांना घाणेंद्रियांचे विकार जडले आहेत. आम्ही विकसित केलेल्या अल्फाक्सोमीटर यंत्राद्वारे सुमारे 200 रुग्णांच्या चाचण्या घेतल्या. त्यांना 10 प्रकारचे गंध ओळखण्यास दिले असता 80 टक्के रुग्णांना ते ओळखताच आले नाहीत. कोरोनामुळे रुग्णांच्या चेतासंस्थेवर परिणाम झाला आहे. गंध ओळखणारी संवेदनाच अनेक रुग्णांत नाहीशी झाली असल्याचे पुढे आले. – डॉ. निक्सॉन अब्राहम, (शास्त्रज्ञ, राष्ट्रीय विज्ञान संस्था, पुणे)

Corona Vaccine : अशी तयार होते कोणत्याही रोगाची लस!

  • कोणत्याही रोगाची लस तयार करणे ही एक प्रदीर्घकाळ चालणारी प्रक्रिया असते आणि त्याच्या संशोधनाचे अनेक टप्पे असतात.
    पहिला टप्पा : एखाद्या संसर्गजन्य रोगाचा शोध, त्याच्या प्रसाराबद्दलचा अभ्यास आणि परिणामकारक लसींचे संशोधन. (कालावधी 2 ते 4 वर्षे)
  • दुसरा टप्पा : फ्री क्लिनिकल टेस्ट म्हणजे शोधून काढलेल्या लसींच्या परिणामकारकतेबद्दल या लसींची वनस्पतींसह काही प्राण्यांवर चाचणी घेणे, या चाचणीतून जे काही निष्कर्ष समोर येतील त्यानुसार पुन्हा त्यावर सखोल संशोधन. (या चाचणीला नेमका किती कालावधी लागेल ते सांगता येत नाही)
  • तिसरा टप्पा : क्लिनिकल ट्रायल म्हणजे संशोधनातून पुढे आलेल्या लसींचा प्रत्यक्ष मानवावर प्रयोग करणे. त्याची परिणामकारकता, दुष्परिणाम याबाबत निष्कर्ष. (कालावधी साधारणत: 1 ते 2 वर्षे)
  • चौथा टप्पा : संशोधन प्रक्रियेचे पुनरावलोकन करणे, अतिरिक्त चाचण्या घेणे, अंतिम निष्कर्ष काढणे. (कालावधी 2 ते 3 वर्षे)
  • पाचवा टप्पा : संबंधित लसींची उत्पादन गुणवत्ता अवलोकन करून त्याचे उत्पादन व प्रत्यक्ष वापर सुरू करणे. (कालावधी 5 ते 10 वर्षे)

हेही वाचा 

 

Back to top button