नाशिक : हेमंत पारख अपहरण प्रकरणातील चौघांना न्यायालयीन कोठडी | पुढारी

नाशिक : हेमंत पारख अपहरण प्रकरणातील चौघांना न्यायालयीन कोठडी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

इंदिरानगर येथील बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख यांचे अपहरण करीत खंडणी घेतल्याप्रकरणी अटकेत असलेल्या चार संशयितांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे त्यांची रवानगी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. तर इतर तिघांच्या शोधासाठी पथक परराज्यात तळ ठोकून आहे.

संबधित बातम्या :

अपहरणकर्त्यांनी २ सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजता पारख यांना बंदुकीचा धाक दाखवून अपहरण केले होते. त्यानंतर २ कोटी रुपयांची खंडणी घेतल्यानंतर ३ सप्टेंबर रोजी पहाटे साडेचार वाजता पारख यांची सुटका केली. या प्रकरणी शहर पोलिसांनी तपास करून राजस्थानातून मुख्य सूत्रधार महेंद्र ऊर्फ नारायणराम बिष्णोई (३०), पिंटू ऊर्फ देवीसिंग बद्रीसिंग राजपूत (२९), रामचंद्र ओमप्रकाश बिष्णोई (२०) यांना, तर वाडिवऱ्हे भागातून संशयित अनिल भोरू खराटे (२५, लहानगेवाडी, वाडीवऱ्हे) यास अटक केली. अल्पावधीत पैसे कमविण्यासाठी ‘लॉरेन्स बिष्णोई गँग’च्या नावाचा वापर करून या संशयितांनी पारख यांचे अपहरण करून खंडणी वसूल केल्याचे पोलिस तपासात उघड झाले होते. पोलिसांनी संशयितांना पकडून त्यांच्याकडून खंडणीतील १ कोटी ३१ लाख रुपयांची रोकड, गुन्ह्यात वापरलेले वाहन आणि कट्टा जप्त केला. न्यायालयाने त्यांना २० सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती.

तपासात संशयित हे सराईत गुन्हेगार असल्याचे उघडकीस आले. त्यांनी पारख यांचे अपहरण करण्याचा कट २ महिन्यांपूर्वी रचून सहा दिवस रेकी केल्याचे स्पष्ट झाले. पोलिस कोठडीची मुदत संपल्याने न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या गुन्ह्यातील इतर तीन संशयित अद्याप फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयितांच्या मागावर शहर पोलिस असून, लवकरच त्यांना पकडले जाईल, असा विश्वास पोलिसांनी वर्तवला आहे.

हेही वाचा :

Back to top button