नाशिक : दहा दिवसांत सव्वातीन हजार बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई, शहर वाहतूक शाखेची मोहीम | पुढारी

नाशिक : दहा दिवसांत सव्वातीन हजार बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई, शहर वाहतूक शाखेची मोहीम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

वाहतूक नियमांचे (सिग्नल जंप आणि नो-पार्किंग) उल्लंघन करणाऱ्या बेशिस्त वाहनधारकांविरोधात शहर वाहतूक शाखेने कारवाईचा बडगा उगारला आहे. दि. १० ते २० जुलै या 10 दिवसांत तब्बल ३ हजार ३१० वाहनचालकांवर कारवाई करत २० लाख ६४ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यापुढेही बेशिस्त वाहनचालकांविरोधात दंडात्मक मोहीम सुरूच राहणार असल्याचे शहर वाहतूक शाखेकडून सांगण्यात आले आहे.

शहरात वाढणाऱ्या रस्ते अपघातांमध्ये होणारी प्राणहानी टाळण्यासाठी दुचाकीस्वारांनी सिग्नल जंप न करणे अनिवार्य आहे. तसेच रस्त्यात वाहन पार्किंग करून रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर शहर वाहतूक शाखेतर्फे वेळोवेळी कारवाई करण्यात येते. मात्र, वाहनधारक वाहतुकीचे नियम पायदळी तुडवत असल्याने चालकांच्या मृत्यूत वाढ झाली आहे. त्यामुळे शहर वाहतूक शाखेच्या अधिनस्त युनिट एक ते चारच्या कार्यक्षेत्रात कारवाईची मोहीम राबविण्यात आली होती.

पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, उपआयुक्त मोनिका राऊत, सहायक पोलिस आयुक्त डॉ. सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेने गेल्या 10 दिवसांत सिग्नल जंपच्या २ हजार ५७८ इतक्या कारवाया करत १५ लाख ६३ हजारांचा दंड वसूल केला, तर नो-पार्किंग अन्वये ७३२ केसेस करून ५ लाख १ हजाराचा दंड वसूल करण्यात आला आहे. दरम्यान, सर्व वाहनधारकांनी सिग्नल जंप न करता वाहतूक नियमांचे पालन करावे तसेच पे ॲण्ड पार्कमध्ये आपली वाहने उभी करावी, असे आवाहन शहर वाहतूक शाखेने केले आहे.

१६६ परवाने रद्दचे प्रस्ताव

काही वाहनचालकांकडून वारंवार वाहतूक नियमांचे उल्लंघन केले जाते. या बेशिस्त वाहनचालकांचे वाहन चालविण्याचा परवाने रद्द करण्याची कारवाई वाहतूक विभागामार्फत केली जात आहे. त्या अंतर्गत आतापर्यंत १६६ वाहनधारकांचे परवाने रद्द करण्याचे प्रस्ताव सादर केल्याचे शहर वाहतूक शाखेकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा :

Back to top button