वैज्ञानिकांचा डोळा चुकवून पृथ्वीजवळून गेला लघुग्रह! | पुढारी

वैज्ञानिकांचा डोळा चुकवून पृथ्वीजवळून गेला लघुग्रह!

वॉशिंग्टन : पृथ्वीजवळून अनेक वेळा लघुग्रह जात असतात. अशा अवकाशीय शिळांचा एक पट्टाच गुरू व मंगळ या दोन ग्रहांदरम्यान आहे. त्याला ‘अस्टेरॉईड बेल्ट’ असे म्हटले जाते. आताही पृथ्वीजवळून एक लघुग्रह पुढे निघून गेला. त्याचा आकार वीस मजल्यांच्या एखाद्या गगनचुंबी इमारतीइतका होता. चंद्रापेक्षाही अधिक अंतरावरून हा लघुग्रह गेला. विशेष म्हणजे पृथ्वीजवळून इतका मोठा लघुग्रह गेला आणि त्याची गंधवार्ताही संशोधकांना लागली नाही. वैज्ञानिकांना दोन दिवसांनंतर या लघुग्रहाची माहिती मिळाली!

‘नासा’ने दिलेल्या माहितीनुसार आता या लघुग्रहाला ‘2023 एनटी 1’ असे नाव देण्यात आले आहे. हा लघुग्रह सुमारे 200 फूट रुंदीचा होता. 13 जुलैला तो ताशी 86 हजार किलोमीटर इतक्या प्रचंड वेगाने पृथ्वीजवळून गेला. हा लघुग्रह सूर्याच्या दिशेने पृथ्वीकडे उड्डाण करीत होता व त्यामुळे सूर्यप्रकाशाच्या झगमगाटाने तो पृथ्वीजवळून गेल्याचे बर्‍याच वेळानंतर दुर्बिणींना कळवले! खगोलशास्त्रज्ञांना 15 जुलैपर्यंत या अवकाशीय शिळेची माहिती मिळाली नव्हती. या लघुग्रहाला दक्षिण आफ्रिकेच्या ‘अटलास’ दुर्बिणीने सर्वप्रथम पाहिले. ही दुर्बीण अनेक दुर्बिणींना एकत्र करून बनवलेली आहे. तिला अनेक दिवसांपासून अनेक आठवड्यांपर्यंतच्या लघुग्रहांची ओळख करण्यासाठी डिझाईन केले आहे.

इंटरनॅशनल अस्ट्रोनॉमिकल युनियनच्या मायनर प्लॅनेट सेंटरनुसार काही वेळानंतर एक डझनपेक्षाही अधिक दुर्बिणींनीही या लघुग्रहाला पाहिले. वैज्ञानिकांचा डोळा चुकवून गेलेला हा लघुग्रह इतकाही मोठा नव्हता किंवा इतकाही जवळ नव्हता की, त्याच्यापासून पृथ्वीला धोका असेल. आता त्याच्याविषयीची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. अलीकडेच झालेल्या एका संशोधनानुसार पृथ्वी पुढील एक हजार वर्षे लघुग्रहांपासून सुरक्षित आहे!

Back to top button