जुलै ठरणार शंभर वर्षातील सर्वात उष्ण महिना? | पुढारी

जुलै ठरणार शंभर वर्षातील सर्वात उष्ण महिना?

वॉशिंग्टन : ‘नासा’चे वरिष्ठ हवामानविषयक वैज्ञानिक (क्लायमॅटोलॉजिस्ट) गेविन श्मिट यांनी म्हटले आहे की, जुलै 2023 हा कदाचित गेल्या शंभर वर्षांच्या काळातील सर्वात उष्ण महिना ठरण्याची शक्यता आहे. याच महिन्यात आतापर्यंत कोणत्या ना कोणत्या देशात उष्णतेचे जुने विक्रम मोडले जात आहेत. युरोपियन युनियन आणि मेन युनिव्हर्सिटीमध्ये झालेल्या संशोधनातून या विक्रमी तापमानवाढीची माहिती समोर येत आहे.

या काळात ग्राऊंड आणि सॅटेलाईट डेटाचाही अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये उष्णतेची लाट वाढली असल्याचे दिसून आले तसेच त्यामुळे झालेले नुकसानही समोर आले आहे. श्मिट यांनी सांगितले की, हवामान बदलाची क्रिया अत्यंत वेगाने घडत आहे. अमेरिका, युरोप, चीनमध्ये हिटवेव्ह म्हणजेच उष्णतेच्या लाटेने स्थिती बिघडत चालली आहे. अनेक ठिकाणी पारा 40 अंश सेल्सिअसच्या वर गेला आहे. तापमान सातत्याने वाढतच चालले आहे. जुने विक्रम मोडले जात आहेत. हे सर्व ‘अल निनो’मुळे होत आहे.

‘अल निनो’ हा एक वेदर ट्रेंड असून तो काही वर्षांमध्ये एकदाच होतो. ही घटना जगातील सर्वात मोठ्या प्रशांत महासागरात होते. त्यामध्ये पूर्व प्रशांत महासागरातील पाण्याचा पृष्ठभाग उष्ण होतो. वर्ल्ड मेटियरोलॉजिकल ऑर्गनायझेशने (डब्ल्यूएमओ) म्हटले आहे की, या क्षेत्रात फेब्रुवारीमध्ये सरासरी तापमान 0.44 अंशाने वाढून जूनच्या मध्यापर्यंत 0.9 अंशावर आले होते. सध्या अल-निनोचा हवामान बदलावरील परिणाम कमी होत आहे. मात्र आगामी काळात तो वाढू शकतो. समुद्राच्या पाण्याचा वरचा स्तर वेगाने उष्ण होत आहे.

Back to top button